प्रत्येक रस्त्यावर खड्डेच खड्डे : विकासाच्या नावावर फक्त लूटलोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : शहरातील सर्वच रस्ते खड्ड्यांनी गायब झाले असून रस्त्याऐवजी सर्वत्र पाण्याचे डबकेच दिसून येत आहेत. त्यामुळे ‘रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ते’ हेच कळत नाही. कोणता सिमेंट रस्ता कोणता डांबरी रस्ता हे आता फक्त रेकॉर्डपुरते नमूद असून संपूर्ण शहर चिखलमय आणि खड्डेमय झाले आहे. त्यामुळे लोकांना रस्त्यावर वाहन चालविणे कठिण झाले असून पायी चालणेही धोक्याचे झाले आहे. शहरातील ‘रस्ते अपघाताला सस्ते’ असेही लोक बोलू लागले आहेत. त्यामुळे या रस्त्यांचा वाली कोण? असा प्रश्न निर्माण निर्माण होत आहे.शहरातील रस्त्याची प्रत्यक्ष पाहणी केल्यावर लक्षात येते की, शहर आणि शहरालगत बाहेर जाणाऱ्या सर्वच रस्त्यांवर सध्या मोठ-मोठे खड्डे आणि पाण्याचे डबके याशिवाय काहीच दिसत नाही. रस्त्यांची दुर्दशा बघून प्रत्येकाला रस्त्यावरुन जाताना किळस वाटत आहे. परंतु स्थानिक प्रशासन व संबंधित बांधकाम विभागाने याकडे सपशेल दुर्लक्ष करुन ठेवलयाचे दिसत आहे. शहरात बस स्थानक ते सुभाष चौक, बस स्थानक ते बाजार चौक, गांधी चौक ते सुभाष चौक, गांधी चौक ते पोलीस स्टेशन, सुभाष चौक ते रेल्वे स्टेशन, विभाग चौक ते रेल्वे स्टेशन तसेच पोलीस स्टेशन ते गडमाता रोड यासह काही इतर मार्ग गावातील लोकांसह संपूर्ण तालुक्यातील लोकांसाठी अति महत्वाचे असून या मार्गावरुन लोकांची नेहमी ये-जा असते. सालेकसा हे तालुक्याचे ठिकाण असल्याने सुद्धा सतत लोकांचे आवागमन सुरु असते. अशात प्रत्येक मार्गावर खड्ड्याशिवाय काहीच दिसत नाही. यापेक्षा मोठे दुर्भाग्य कोणते असावे की लोकांना चालायला चांगले रस्ते उपलब्ध होऊ शकत नाही. मोठ-मोठे खड्डे पडून लोकांना भीती वाटते. पायी चालत असताना दरम्यान एखादी दुचाकी किंवा चारचाकी वाहन त्या रस्त्यावरुन गेले तर चिखल अंगावर आल्याशिवाय राहत नाही. या रस्त्यावरुन जनावरे आणि बैलबंड्या सुद्धा ये-जा करीत असल्याने रस्त्यावर शेणाची घाण सुद्धा पसरली असते. अशात वाहने जाताना अंगावर शेण सुद्धा उडते. एकंदरीत विचार केला तर कपडे खराब होतात शिवाय आरोग्याला धोका निर्माण करणारी घाण नाका तोंडात शिरते.एवढी वाईट स्थिती शहरातील रस्त्यांची झालेली आहे. त्यामुळे सामान्य महिला आणि मुलींना तर रस्त्यावरुन चालण्यात जास्त भिती वाटते. या रस्त्यावरुन शाळा, कॉलेजचे विद्यार्थी सुद्धा ये-जा करतात. अंगणवाडी आणि प्राथमिक शाळेत उत्साहाने जाणारी चिमुकले सुद्धा दिसतात. परंतु, चिखलाने माखलेल्या रस्त्यांमुळे स्वच्छ कपडे घालून जाणारी मुले चिखलाने माखलेले कपडे घालून परत येतात.
शहरातील रस्ते बनले जलाशय
By admin | Published: July 17, 2017 1:25 AM