येथे ३३ केव्हीचे स्वतंत्र वीज उपकेंद्र असूनसुद्धा मिनिट आणि तासाच्या अंतराने वीजपुरवठा खंडित होत असतो. वीज विभागाच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांना फोन केल्यास ते उचलत नाहीत. उचलला तर काही तरी बिघाड किंवा वरून बंद असल्याचे सांगितले जाते. मंगळवारी (दि.२९) रात्री अनेकदा वीजपुरवठा खंडित होण्याच्या प्रकारामुळे नागरिकांना उकाड्यात डासांचा सामना करीत रात्री काढावी लागली. पावसाने फक्त सुरुवात केली होती. मात्र, सध्या उन्हाळाच सुरू असून, उकाडा वाढला आहे. त्यात वारंवार अचानक वीजपुरवठा खंडित होत असल्यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. पाऊस आला, निघून गेला, त्यामुळे उन्हाळ्याची तीव्रता वाढू लागली आहे. पंखे व कूलरचा वापर वाढला असून, अशा स्थितीत वीजपुरवठा सतत खंडित होत असल्याने विजेवर चालणारी उपकरणे खराब होऊ लागली आहेत. या प्रकारामुळे ग्राहक संताप व्यक्त करीत आहेत. वीज वितरण कंपनीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देऊन सुरळीत व अखंड वीजपुरवठा करावा, अशी मागणी साखरीटोलावासीयांनी केले आहे.
विजेच्या लपंडावाने साखरीटोलावासी संतापले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 01, 2021 4:21 AM