शेंडा/कोयलारी : सडक/अर्जुनी तालुक्यातील कोयलारी ग्रामपंचायतचा सरपंचाविरुद्धचा अविश्वास ठराव एका महिला सदस्याच्या अनुपस्थितीमुळे नापास झाला. त्यामुळे कार्यरत सरपंच हिरालाल मेश्राम हे पदावरून पायउतार होण्यापासून बचावले.कोयलारी येथे गट ग्रामपंचायत असून एकून नऊ सदस्य आहेत. पैकी काहींनी सरपंचावर मनमर्जीने काम करणे, जनतेच्या समस्या न सोडविता सभेतून पळ काढणे, अशा प्रकारचे आरोप ठेवून पाच सदस्यांच्या सह्यानिशी अविश्वासाची ठराव प्रत तहसीलदार एन.जे. उईके यांच्याकडे सादर केली.त्यानुसार तहसीलदाराने कारवाई करून नऊही सदस्यांना २१ आॅगस्ट रोजी दुपारी १ वाजता हजर राहण्याचे नोटीस बजावले होते. प्रक्रिया सुरू होण्याआधी पोलिसांचा चोख बंदोबस्त करण्यात आला होता. अविश्वासाची प्रक्रिया हात उंचावून राबविण्यात आली होती. यावेळी नऊ पैकी आठ सदस्य हजर होते व एक महिला सदस्य गैरहजर होती. त्यामुळे सरपंचाच्या बाजूने तीन तर विरोधी बाजूने पाच सदस्यांनी हात वर करून मतदान केले.अविश्वास ठराव पारीत होण्यासाठी ६ विरुद्ध ३ असा मतदान आवश्यक होता. एक महिला सदस्यांच्या गैरहजर राहिल्याने अविश्वास ठराव पारीत होवू शकला नाही. त्यामुळे सध्या पदावर असलेले सरपंच हिरालाल मेश्राम हे पदावर कायम राहतील अशी सूचना तहसीलदार उईके यांनी दिली. त्यामुळे हिरालाल मेश्राम पायउतार होण्यापासून बचावले.सरपंच हिरालाल मेश्राम यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता मी मनमर्जीने कोणताही काम केले नाही. ग्रामसभेला व मासिक सभेला नियमित हजर असतो. गट ग्रामपंचायत असल्यामुळे स्वातंत्र्यदिनी सकाळी ७.३० ते १२ वाजतापर्यंत कोयलारीची ग्रामसभा आटोपून १२.३० ते २ वाजेपर्यंत प्रधानटोला येथे ग्रामसभेला हजर असल्याचे सांगितले. परंतु माझ्याविरूध्द कट करणाऱ्यांचा डाव हाणून पाडल्याचे ते म्हणाले.
कोयलारी सरपंचाविरूध्दचा ठराव नापास
By admin | Published: August 24, 2014 12:05 AM