लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : परिवारात बाळ जन्माला आले. त्याचा आनंद साजरा करीत असतानाच त्याचे नामाकरण काय करायचे यावरुन परिवारात चर्चेला सुरूवात झाली. बहिणीनी एक नाव तर भाऊ व वहिनीने दुसरे नाव तर परिवातील इतर सदस्यांनी तिसरेच नाव सुचविले. यामुळे नामकरणावरुन भावनिक पेच निर्माण झाला. त्यामुळे कुणाचेही मन दुखावले जाऊ नये म्हणून बाळाच्या नामकरणासाठी मतदान घेवून हा तिढा सोडविण्याचा निर्णय घेतला. तब्बल १४९ जणांनी बॅलेट पेपरच्या मदतीने मतदान करुन बाळाचे नामकरण केले. हा अभिनव प्रयोग देवरी येथील बंग परिवाराने केला.देवरी येथील बन्सीलाल बंग यांचे कनिष्ठ चिरंजीव मिथून बंग यांच्याकडे बाळ जन्माला आले. त्यानंतर बाळाचे नामाकरण करण्यासाठी दिवस निश्चित करण्यात आला. बाळाच्या जन्म कुंडलीनुसार त्याची जन्मपत्रिका काढण्यात आली. त्यानंतर बंग परिवातील सदस्यांमध्ये बाळाचे नामाकरण करण्यासाठी नावांचा शोध घेण्यास सुरूवात झाली. यक्ष, युवान, यौविक ही तीन नावे पुढे आली. मात्र बाळाचे आजी आजोबा, मोठे वडील यांनी एक नाव निश्चित केले तर इतर सदस्यांनी दुसऱ्या नावाला पसंती दिली. काही सदस्यांनी तिसरेच नाव सुचविले. त्यामुळे मिथुन व त्यांच्या पत्नीसमोर मोठा पेच निर्माण झाला.यापैकी कुणाचे एकाचे ऐकल्यास परिवारातील इतर सदस्य दुखावले जातील. मात्र या आनंदाच्या क्षणी कुणाचेही मन दुखावले जाऊ नये, पारिवारीक आनंद कायम रहावा, यासाठी बाळाचे नामाकरण बॅलेट पेपरव्दारे मतदान घेऊन निश्चित करण्याचा निर्णय मिथून बंग यांनी घेतला. त्यांच्या या निर्णयाला परिवारातील सर्व सदस्यांनी समर्थन केले. त्यामुळे नामकरण सोहळ्याला चक्क मतदान केंद्राचे स्वरुप आले होते. या वेळी घेण्यात आलेल्या मतदान प्रक्रियेत १४९ जणांनी मतदानाचा हक्क बजाविला. यात सर्वाधिक ९२ जणांनी युवान नावाला मतदान केल्याने बाळाचे नामकरण युवान करण्यात आले. मतदान घेऊन बाळाचे नामाकरण केल्याची जिल्ह्यातील पहिलीच घटना होय. दरम्यान बंग परिवाराच्या या अभिनव प्रयोगाचे सर्वत्र कौतुक केले जात आहे.पटोले, पुराम, राऊत यांनी केले मतदानदेवरी येथील बंग परिवाराचे माजी खा.नाना पटोले, आ.संजय पुराम, माजी.आ.रामरतन राऊत यांच्याशी पारिवारीक संबंध आहे. त्यामुळे या नामाकरण सोहळ्याचे त्यांना सुध्दा निमंत्रण देण्यात आले होते. यासर्वांनी या सोहळ्याला आर्वजून उपस्थिती लावून बाळाच्या नामकरण सोहळ्याचा मतदान प्रक्रियेत सहभाग घेत मतदान केले. बंग परिवाराच्या या अभिनव प्रयोगाचे कौतुक केले.मतदानाने जपल्या भावनाबाळाचे नामकरण करण्यावरुन बंग परिवारात भावनिक पेच निर्माण झाला होता. बरेचदा अशाच छोट्या छोट्या कारणावरुन भावना दुखावल्या गेल्याने संबंधामध्ये कटुता निर्माण होते. मात्र बंग परिवाराने यावर मतदानाचा पर्याय शोधून सर्वांच्याच भावना जपण्याचा प्रयत्न केला.
मतदानाने सोडविला बाळाच्या नामकरणाचा तिढा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 21, 2018 9:51 PM
परिवारात बाळ जन्माला आले. त्याचा आनंद साजरा करीत असतानाच त्याचे नामाकरण काय करायचे यावरुन परिवारात चर्चेला सुरूवात झाली. बहिणीनी एक नाव तर भाऊ व वहिनीने दुसरे नाव तर परिवातील इतर सदस्यांनी तिसरेच नाव सुचविले.
ठळक मुद्देलोकप्रतिनिधींनी केले मतदान : बंग परिवाराचा अभिनव उपक्रम