सखी मंचचा उपक्रम : सखींच्या प्रोत्साहनासाठी आगळावेगळा कार्यक्रम सालेकसा : लोकमत सखी मंचच्यावतीने तालुक्यातील कर्तृत्ववान सखींचा स्मृतिचिन्ह आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्याचा सोहळा उत्साहात पार पडला. पंजाबी गुरुद्वारा सभागृहात आयोजित या सत्कार सोहळ्याचे उद्घाटन आमगाव खुर्दच्या उपसरपंच हरजीत कौर भाटीया यांच्या ह्ते करण्यात आले. अध्यक्षस्थानी शिक्षीका जयश्री गोल्लीवार होत्या. प्रमुख अतिथी म्हणून कला मानकर, हेमलता वैद्य, संजीता चौरे, संगीता रेड्डीवार उपस्थित होत्या. याप्रसंगी कार्यक्रमाच्या अध्यक्षा गोल्लीवार यांनी, लोकमतद्वारा चालविण्यात येणाऱ्या लोकमत सखी मंच या उपक्रमाचे भरभरून कौतुक केले. व सखी मंच सारखे व्यासपीठ महिलांसाठी किती महत्वाचे आहेत हे समजावून सांगीतले. कार्यक्रमाच्या उद्घाटक भाटीया यांनी, सखी मंचच्या प्रत्येक उपक्रमाला यशस्वी करण्यासाठी वाटेल ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. त्यांच्या वेळोवेळी लाभत असलेल्या सहकार्यामुळे मागील दोन वर्षापासून येथील पंजाबी गुरूद्वारा सभागृह लोकमत सखी मंचच्या प्रत्येक उपक्रमासाठी व कार्यक्रम आयोजित करण्यासाठी उपलब्ध करून देण्यात येत आहे. एवढेच नाही तर कार्यक्रमा दरम्यान आवश्यक त्या सर्व भौतिक सोयी सुविधा सुध्दा पुरविल्या जातात. प्रास्ताविकात लोकमत सखी मंचच्या तालुका संयोजिका किरण मोरे यांनी, मागील तीन वर्षापासून चालत असलेल्या लोकमत सखी मंचच्या यशस्वी वाटचाली बद्दल आढावा सादर केला. दरम्यान उत्कृष्ट सहकार्य करणाऱ्या कर्तृत्ववान सखींचा सत्कार घेण्याचा हेतु स्पष्ट केला. सत्कार सोहळ्या दरम्यान सखींनी मनोरंजनात्मक कार्यक्रम सुध्दा सादर केले. यावेळी सखी मंच सदस्यांना मिळणाऱ्या नि:शुल्क कॉम्प्युटर कोर्सबद्दल माहिती देण्यात आली. तसेच काष्ठ शिल्पकार व हस्तकला संस्थेचे संचालक मनोहर उईके यांनी आपल्या अंगी असलेल्या कलेचा उपयोग करून आत्मनिर्भर बनण्यासाठी काय काय करता येईल याबद्दल मार्गदर्शन केले. संचालन सीमा हरिणखेडे यांनी केले. आभार किर्ती कवरे यांनी मानले. कार्यक्रमासाठी पिंकी कापसे, स्वाती रोकडे, कविता येटरे, यशोदा मुनेश्वर, छाया उके, पारबता बारसे, फुलवंता (पूजा) भेलावे, वंदना मेहर, अनिता वैद्य, योगेश्वरी नेवारे, सीमा मडावी, ममता चुटे यांनी सहकार्य केले. (तालुका प्रतिनिधी)
कर्तृत्ववान सखींचा सन्मान
By admin | Published: April 05, 2017 1:03 AM