गोंदिया : कोरोनाकाळात संपूर्ण ग्रामीण भागातील बस सेवा बंद करण्यात आली होती. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यामुळे शासनाने सर्वच क्षेत्र लॉकडाऊनपासून मोकळे केले आहे. त्यामुळे मागच्या ६ महिन्यांपासून बंद असलेली ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ववत सुरू करावी, अशी मागणी ढाकणी येथील सामाजिक कार्यकर्ते प्रीतम मेश्राम यांनी प्रशासनाकडे केली आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून शासनाने मागच्या मार्च महिन्यात संपूर्ण बस सेवा बंद केली होती. त्यात ग्रामीण भागातील बस सेवेचाही सहभाग होता. परंतु आता कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाला आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन शिथिल करून बाजारपेठा तसेच वाहतुकीचे क्षेत्र मोकळे केले आहे. त्यात मोठ्या शहरांना तसेच जिल्हास्थळांना जोडणारी बस सेवादेखील सुरू करण्यात आली. परंतु अद्यापही ग्रामीण भागातील बस सेवा बंद ठेवण्यात आलेली आहे.
ग्रामीण भागातील दळणवळणाचे मुख्य साधन म्हणून बस सेवेची ओळख आहे. त्यातच बस सेवा बंद असल्यामुळे गावातील नागरिकांना शहरात रोजगारासाठी येण्या-जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागत आहे. त्यातच आता शाळा व महाविद्यालयदेखील सुरू झाल्यामुळे विद्यार्थी व शाळकरी मुलींना येण्या-जाण्यासाठी मोठी अडचण येत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या अडचणी लक्षात घेऊन प्रशासनाने तसेच एसटी महामंडळाने ग्रामीण भागातील बस सेवा पूर्ववत व नियमित सुरू करावी, अशी मागणी मेश्राम यांनी प्रशासनाकडे लावून धरली आहे.