बाराभाटी : मागील मार्च महिन्यापासून कोरोना प्रादुर्भावामुळे शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यात वर्ग ९ ते १२ वीपर्यंतच्या काही २८ नोव्हेंबरपासून सुरू झाल्या. मात्र, ज्या शाळा बंद आहेत, तेथील विद्यार्थ्यांच्या अभ्यासाचे नुकसान होत आहे. अशा विद्यार्थ्यांनी काय करावे, असा प्रश्न पालकांसह विद्यार्थ्यांनाही पडला आहे. आता वर्ष होत असल्याने विद्यार्थीही वैतागले असून, त्यांना शाळेची ओढ लागली आहे. करिता शाळा सुरू करून शिकण्याचा आमचा हक्क आम्हाला परत मिळवून द्या, अशी मागणी ते करीत आहेत.
राज्यात शासनाने २८ नोव्हेंबरपासून वर्ग ९ ते १२ वीपर्यंतच्या शाळा सुरू करण्यास परवानगी दिली आहे, पण यामध्ये खासगी शाळा काही प्रमाणात सुरू झाल्या. मात्र, आदिवासी विकास विभाग, सामाजिक न्याय व विशेष साहाय्य विभाग, जिल्हा परिषद शाळा, आश्रमशाळा व निवासी शाळांना अजूनही मुहूर्त निघालाच नाही. कोरोना काळात अनेक शाळांनी ऑनलाइन क्लास चालविले आणि काहींचे सुरू आहेत. अशा शिकवणी प्रकाराने विद्यार्थ्यांच्या आकलनशक्तीवर थोडाही परिणाम झालेला नाही. १० टक्केही विद्यार्थ्यांच्या अभ्यास झालेला नाही. अलीकडे कोरोना प्रादुर्भाव कमी झालेला दिसून येतो. यावर लस तयार होऊन लसीकरणाला सुरुवात झाली आहे. आता सर्वच कामकाज पूर्ववत सुरू झाले असून, शाळाच का अर्धवट सुरू झाल्या, असा प्रश्न पालकांना पडला आहे.
------------------------