घरभाडे भत्ता घेतात: बायोमॅट्रीक मशीनचे पुरावे द्या लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : मागील दोन वर्षापासून या वैद्यकीय महाविद्यालयाच्या नावावर अधिकारी कर्मचारी नियुक्त करण्यात आले. परंतु त्यांना काम काहीच नसल्याने खुर्च्या मोडून मागील वर्षभरापासून वेतन घेत आहेत. काम न करता विदर्भ एक्सप्रेसने येणे व जाणे हाच नित्यक्रम झाला आहे. केटीएस किंवा बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात डॉक्टरांची कमतरता असताना या वैद्यकीय महाविद्यालयातील कर्मचारी, अधिकारी विदर्भ एक्सप्रेसने दुपारी १२ वाजता येणे व तीन तास खुर्च्या तोडून २.५५ च्या विदर्भ एक्सप्रेने परत जातात. गोंदियात वैद्यकीय महाविद्यालय रूग्णांच्या सेवेसाठी तयार होत आहे. यासाठी लोकप्रतिनिधींनी मेहनत घेऊन गोंदिया जिल्ह्यात वैद्यकीय महाविद्यालय शासनाकडून मंजूर करवून घेतले. या ठिकाणी काम करण्यासाठी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात वर्ग एकचे अधिष्ठाता एक, प्राध्यापक ४, सहयोगी प्राध्यापक १०, वर्ग २ चे सहायक प्राध्यापक ९, वर्ग ३ चे वरिष्ट सहाय्यक २, वरिष्ट लिपीक ८, कनिष्ठ लीपीक ११, लघुलेखक ५, तंत्रज्ञ १, प्रयोगशाळा सहाय्यक तंत्रज्ञ ५, कलाकार १,ट्यूटर १, वरिष्ठ निवासी ४ व शिपायांची ६२ पदे असे एकूण १२४ कर्मचारी अधिकारी कार्यरत आहेत. या पैकी जवळ-जवळ सर्वच अधिकारी कर्मचारी बाहेर गावावरून अपडाऊन ये-जा करतात. मात्र गोंदियात मुख्यालयी राहात असल्याची खोटी माहिती शासनाला पुरवून येथील अधिकारी कर्मचारी घरभाडे भत्ता घेत असल्याची माहिती आहे. त्या कर्मचारी अधिकारी यांनी यांनी घेतलेला घरभाडे भत्ता त्यांच्याकडून वसूल करण्यात यावा असा सूर उमटत आहे. येथील अधिकारी व कर्मचारी विदर्भ एक्सप्रेसने येणे-जाणे करतात. त्यांच्यावर वचक ठेवण्यासाठी या ठिकाणी बायोमॅट्रीक मशीन लावणे गरजेचे आहे. त्यांचे वेतन काढण्याच्या अगोदर बायोमॅट्रीक मशीनमधून आलेल्या फिंगरप्रिन्टच्या आधारावरच वेतन काढण्यात यावे. ज्या दिवशी जे कर्मचारी, अधिकारी येणार नाही त्या दिवशीचे बोटाची प्रिंट राहणार नाही. याकडे लक्ष देण्याची मागणी आहे. लोकप्रतिनिधी लक्ष घालतील का? शासकीय महाविद्यालयात १२४ कर्मचारी अधिकारी कार्यरत असून आतापर्यंत या वैद्यकीय महाविद्यालयात कार्यरत अधिकारी यांनी एकही रूग्णाची तपासणी केली नाही. किती रूग्णांची तपासणी केली याचा आकडा मिळेल का असे येथील अधिष्ठाता डॉ. अजय केवलीया यांना विचारणा केल्यावर ते एकाही रूग्णाची माहिती देऊ शकत नाही. म्हणून या प्रकाराकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष घालून या अधिकारी कर्मचाऱ्यांना केटीएस व बाई गंगाबाई स्त्री रूग्णालयात सेवा देण्यास बाध्य करण्याची मागणी होत आहे.
मेडीकल कॉलेजच्या विदर्भवीरांना लगाम घाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2017 12:08 AM