गोंदिया : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा बलातून सेवानिवृत्त झालेले उपकमांडंट अशोककुमार हरिप्रसाद मिश्रा (६८) रा. अत्री, ता. खैरलांजी, जि. बालाघाट यांनी गोंदिया शहरात २४०० चौरस फूट घेतलेला प्लाट चार जणांनी बनावट कागदपत्राच्या आधारे दुसऱ्याच व्यक्तीला विक्री केला. त्यांची फसवणूक करणाऱ्या चौघांवर गोंदिया शहर पोलिसांनी फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे.
अशोककुमार हरिप्रसाद मिश्रा (६८) यांनी १८ जून १९९१ ला गोंदियाच्या मनोहरभाई वॉर्डातील खसरा न ६६०/३७ आर जी २४०० चौ. फुट जमीन भूमापन गट (भूमापन गट क ६६०/३७ व फेरफार क ७०२ व ९९५९) ही जमीन शकुंतला रामदयाल पांडे रा. बजाज वाॅर्ड, गोंदिया यांच्याकडून खरेदी केला होता. ती जमीन गोंदियात रजिस्ट्री झाली. ती जमीन त्यांनी कुणालाही विकलेली नाही. अशोककुमार मिश्रा यांनी जून २०२१ मध्ये आपल्या मोबाइलमध्ये खरेदी केलेल्या जमिनीचा सातबारा उतारा ऑनलाइन पाहिला असता त्यावर विलास दशरथ मानापुरे यांच्या नावावर सातबारा असल्याचे दिसून आले. परंतु कोरोना महामारीमुळे राज्यात लॉकडाऊन होते. त्यामुळे मिश्रा घराबाहेर पडू शकले नाही. त्यांनी आपल्या जमिनीबाबत चौकशी १ जुलै रोजी कुडवा येथील तलाठी कार्यालयात जाऊन खरेदी केलेल्या जमिनीचा सातबारा उताऱ्याची प्रमाणित प्रत मिळवली असता त्यांच्या मालकीची जमिनीवर विलास दशरथ मानापुरे, रा. सख्खर धर्मशाळेच्या पाठीमागे, चुडामण चौक, माताटोली, गोंदिया यांच्या नावाने असल्याचे आढळले.
........
दुय्यम प्रत मागविल्यानंतर प्रकार उघडकीस
जमिनीचा भूमापन क्रमांक व उपविभाग - ६६०/३७ असा आहे. त्याचे जुने फेरफार क्रमांक - ७०२, ९९५९ ४ ७३०५६ असे असल्याचे दिसून आले. तलाठी कार्यालयातून विक्री झालेल्या जमिनीचे फेरफार पंजीवरून विक्री झालेल्या जमिनीचा दस्त क्रमांक मिळवला व तो घेऊन रजिस्ट्रेशन कार्यालयात गेल्यावर रजिस्ट्रेशन कार्यालयास पत्रव्यवहार करून माझी जमीन विक्री झालेल्या दुय्यम प्रत मिळवली. त्या १ जुलै २०२० सह दुय्यम निबंधक वर्ग २ गोंदिया येथे खरेदी करणारा विलास दशरथ मानापुरे (४३) रा. सख्खर धर्मशाळेच्या पाठीमागे, चुडामण चौक, माताटोली, गोंदिया यांच्या नावाने रजिस्ट्री केल्याचे आढळले.
............
यांच्यावर केला गुन्हा दाखल
या प्रकरणात आरोपी विलास दशरथ मानापुरे (४३), मुकेश रमेशकुमार मिश्रा (४७) खापर्डे कॉलनी शारदा चौक कुडवा, मनोज खुमानराव बागडकर (४७) रा. चुडामण चौक मालवीय वॉर्ड गोंदिया व बोगस रजिस्टी करताना उपकमांडंट अशोककुमार हरिप्रसाद मिश्रा यांच्या नावाने रजिस्ट्रीच्या वेळी उभा करण्यात आलेला इसम अशा चौघांवर गोंदिया शहर पोलीस ठाण्यात भादंविच्या कलम ४१९, ४२०, ४६५, ४६७, ४६८, ४७१, ३४ अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे. तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक महादेव शिंदे करीत आहेत.