नरेश रहिले लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आपण हॉटेल चालक असाल तर ग्राहकांच्या आरोग्याची काळजी घ्या. स्वत:च्या फायद्यासाठी वारंवार तेच तेल वापरू नये अन्यथा आपण ग्राहकांना कर्करोगाच्या मुखात टाकाल. आपला व्यवसाय करताना ग्राहकांना वेठीस धरू नका, अन्यथा आपल्याला कारवाईस सामोरे जावे लागेल. गोंदिया जिल्ह्यात असलेल्या २०० हॉटेलांत पदार्थ तळण्यासाठी वारंवार तेच तेल वापरले जात असेल तर अशा हॉटेल चालकांवर आता अन्न व औषध प्रशासन विभाग कारवाई करणार आहे. हॉटेलात तळीव पदार्थांसाठी वापरणारे तेल वारंवार वापरले जाते. ते तेल २५ पोलार युनिटच्या वर वापरू नये, अशा सूचना असतानाही हॉटेल चालकांकडून काळेकुट्ट तेल होईपर्यंत वापरले जाते. या तेलातून तळलेले पदार्थ सेवन केल्यास ग्राहकांना कर्करोगासारख्या आजाराला सामोर जावे लागू शकते. हे होऊ नये यासाठी गोंदियाच्या अन्न व औषध प्रशासनाने हॉटेलांची तपासणी करण्याची मोहीम सुरू केली आहे. ‘रियूज कुकिंग ऑइल’ वापरणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा अन्न व औषध प्रशासनाने दिला आहे.
मे. शालिमार हॉटेलची तपासणी- अन्न व सुरक्षा विभागाने गोंदियातील हॉटेलांमधील ‘रियूज कुकिंग ऑइल’ तपासणी केली. गोंदियाच्या कुडवा येथील मे. शालीमार हॉटेलातील वापरण्यात येणाऱ्या तेलाची तपासणी करण्यात आली. अन्न सुरक्षा सहा. आयुक्त अभय देशपांडे, अन्न सुरक्षा अधिकारी भास्कर नंदनवार, पीयूष मानवतकर, शीतल देशपांडे यांनी तपासणी केली. समोसा, कचोरी व तेलात तळले जाणारे इतर पदार्थ यांसाठी वारंवार त्याच तेलाचा वापर होऊ नये, तेलाचा पोलार युनिट २५ पर्यंतच वापरण्याचे परवानगी शासनाने दिली आहे. त्यापेक्षा जास्त तेल वापरल्या गेले तर त्या हॉटेल चालकांना कारवाईस सामोरे जावे लागणार आहे. शालीमार हॉटेलातून घेतलेल्या तेलाचे नमुन्यांचा पोलार युनिट १०.५ असल्याने हे तेल वापरण्यायोग्य होते.