सूर्यवंशी : महसूल दिनी अधिकारी-कर्मचाऱ्यांना आवाहन गोंदिया : महसूल विभाग हा प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. या यंत्रणेमार्फत लोककल्याणाच्या विविध योजना राबविण्यात येतात. गरजूंना मदत व योजनांचा लाभ देण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सामाजिक बांधिलकी जोपासून महसूल प्रशासन लोकाभिमुख करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी केले. सोमवारी (दि.१) महसूल दिनाचा जिल्हास्तरीय कार्यक्रम जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता. यावेळी अध्यक्षस्थानावरून डॉ.सूर्यवंशी बोलत होते. प्रमुख अतिथी म्हणून अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर, उपजिल्हाधिकारी विलास ठाकरे, आर.डी.शिंदे, गोंदियाचे उपविभागीय अधिकारी के.एन.के.राव, देवरीचे उपविभागीय अधिकारी सुनील सूर्यवंशी, तिरोडाचे उपविभागीय अधिकारी प्रवीण महिरे यांची मंचावर उपस्थिती होती. डॉ.सूर्यवंशी म्हणाले, शासनाच्या कामात महसूल विभागाची महत्वाची भूमिका आहे. जनतेच्या आयुष्यात सुख शांती आणणारा हा विभाग आहे. त्यामुळेच अनेक जबाबदाऱ्या महसूल विभागावर सोपविण्यात येतात. महसूल प्रशासन लोकाभिमुख व गतिमान करून लोकांना मदत व त्यांच्या अडीअडचणी समजून घ्याव्या असे त्यांनी सांगितले. महिला खातेदारांचे सक्षमीकरण हे महिला सप्ताहात करण्यात येणार आहे. महिलांचे नाव सहखातेदार म्हणून जास्तीत जास्त महिलांनी नोंदविले पाहिजे यासाठी या सप्ताहाचा उपयोग होईल. खऱ्या पिढीत गरजू व्यक्तीला वेळीच केलेली मदत ही समाधान देणारी असते. कार्यालयात कामानिमित्त आलेल्या माणसाचे त्वरित समाधान, त्यासोबतच त्याला मदत व योजनांचा लाभ देण्याचेही काम करावे असेही जिल्हाधिकारी यावेळी म्हणाले. यावेळी महसूल अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्कृष्ट कामिगरीबद्दल मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. संचालन प्रशांत घुरुडे यांनी तर आभार नि.उपजिल्हाधिकारी लोणकर यांनी मानले.(जिल्हा प्रतिनिधी)
महसूल प्रशासन लोकाभिमुख करा
By admin | Published: August 02, 2016 12:13 AM