महाराजस्व अभियान : विभागीय आयुक्त अनुप कुमार यांचे आवाहन गोंदिया : महसूल विभाग प्रशासनाचा कणा म्हणून ओळखला जातो. अनेकांना दैनंदिन कामानिमित्त महसूल विभागाशी संबंध येतो. कामानिमित्त नागरिकांना तहसील, उपविभागीय अधिकारी कार्यालयात वारंवार जावे लागते. हे थांबविण्यासाठी योग्य नियोजन करा. या वर्षात जिल्ह्यात आयोजित करण्यात येणाऱ्या महाराजस्व अभियानातून जनतेची जास्तीत जास्त कामे करून अधिकारी व कर्मचाऱ्यांनी महसूल विभाग लोकाभिमुख करावे, असे आवाहन विभागीय आयुक्त अनुप कुमार यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात शनिवारी १ आॅगस्ट रोजी महसूल दिनानिमित्त जिल्ह्यात महाराजस्व अभियान-२०१५ राबविण्याबाबत महसूल अधिकाऱ्यांची सभा पार पडली. या वेळी विभागीय आयुक्त अनुप कुमार बोलत होते. याप्रसंगी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप गावडे, अपर जिल्हाधिकारी मंगेश मोहिते, निवासी उपजिल्हाधिकारी नरेंद्र लोणकर यांची प्रमुख उपस्थिती होती. अनूप कुमार पुढे म्हणाले, महसूल विभागाशी संबंधित नागरिकांची कामे वेळेत व पारदर्शकपणे करण्यासाठी हे अभियान राबविण्यात येणार आहे. समाधान शिबिराच्या माध्यमातून नागरिकांशी संबंधित असलेली कामे करण्यासाठी तर विस्तारित समाधान शिबिराच्या माध्यमातून विविध शासकीय योजनांची माहिती देण्यासोबतच योजनांचा लाभ देण्यात यावा, असेही सांगितले. महसूल अधिकाऱ्यांकडे सहा महिन्यांपेक्षा जास्त प्रलंबित सर्व अर्ध न्यायिक प्रकरणे डिसेंबर-२०१६ पर्यंत अंतिम निर्णय देऊन निकाली काढावित. एका महिन्यापेक्षा जास्त काळ प्रलंबित असलेले फेरफार निकाली काढण्यासाठी मंडळ मुख्यालयी फेरफार अदालतीचे आयोजन करण्यात यावे. महाराजस्व अभियानांतर्गत दिलेली उद्दिष्टपूर्ती पूर्ण करण्यात यावी, असेही निर्देश आयुक्तांनी या वेळी दिले. जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी म्हणाले, महसूल विभागाकडून विविध प्रकारची प्रमाणपत्रे देण्यात येतात. भविष्यात प्रमाणपत्रावर होलोग्राम करण्याचा विचार आहे. त्यामुळे बनावट प्रमाणपत्रे तयार करण्यावर आळा बसेल. मंडळ स्तरावरदेखील विस्तारित समाधान शिबिर राबविण्याचा विचार असल्याचे त्यांनी सांगितले. या वेळी जिल्हाधिकारी डॉ. सूर्यवंशी यांनी जिल्ह्यातील महसूल विभागाची पदभरती, पदोन्नती, अभिलेख कक्ष अद्ययावात करणे, जडवस्तू संग्रह नोंदवहीचे अद्ययावतीकरण करणे, महालेखापाल जमा लेखा परिच्छेदातील वसुलीची कार्यवाही, दफ्तर तपासणी करण्याबाबतची माहिती दिली. सभेला उपजिल्हाधिकारी उमेश काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत काळे, उपविभागीय अधिकारी के.एन.के. राव, सुनील सूर्यवंशी, जिल्हा खनिकर्म अधिकारी बोमीडवार, जिल्हा नियोजन अधिकारी बकूळराव घाटे तसेच सर्व तहसीलदार उपस्थित होते. (प्रतिनिधी)
महसूल विभाग लोकाभिमुख करा
By admin | Published: August 03, 2015 1:26 AM