गोरेगाव : तालुक्यातील गावागावांत मोठ्या प्रमाणात पंतप्रधान घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, समाजकल्याण विभाग घरकुल योजना, रमाई घरकुल योजनेअंतर्गत घरकुल बांधकामे सुरू आहेत. त्यामुळे वीटभट्टी मालकांनी विटांच्या भावांत वाढ केली आहे. तहसीलदारांनी यात हस्तक्षेप करून विटांचे एकमुस्त दर ठरवून सहा हजार रुपये प्रतिट्रॅक्टर ट्राॅली करावे, अशी मागणी ग्राम कालिटीचे उपसरपंच मनोज बोपचे यांनी केली आहे.
विविध गटांत मोडणाऱ्या गरजू घरकुल लाभार्थ्यांना पंतप्रधान घरकुल योजना, शबरी घरकुल योजना, रमाई घरकुल योजना व समाजकल्याण विभाग घरकुल योजनेंतर्गत मोठ्या प्रमाणात घरकुले मंजूर झाली आहेत. या लाभार्थ्यांना ९० दिवसांत घरकुल बांधकाम करण्याचे फर्मान गटविकास अधिकाऱ्यांनी दिले आहे. घरकुल बांधकाम करताना वाळू, विटा, सिमेंट, मुरुम व इतर साहित्याची गरज असल्याने लाभार्थी वीटमालकांकडे धाव घेत आहेत. या संधीचा फायदा घेत वीटभट्टीमालक प्रतिट्रॅक्टर-ट्रॉली सात हजार ५०० रुपये घेत आहेत. त्यामुळे लाभार्थ्यांना घरकुल बांधकाम करताना महागड्या विटा विकत घ्याव्या लागत आहेत. लाभार्थ्यांनी पाच ब्राॅस वाळूसाठी तहसीलदारांकडे अर्ज दाखल केले आहेत. परंतु ती अद्याप मिळालेली नाही. वीटभट्टी चालू करण्याची परवानगी तहसीलदारांमार्फत देण्यात येते; पण एक ट्रॅक्टर-ट्राॅली विटांची किती हजार रुपयांत विक्री करावी हे ठरवून दिले नसल्याने वीटभट्टी मालक मनमर्जीने दर ठरवून विटा विकत आहेत. घरकुल लाभार्थ्यांची अशी पिळवणूक थांबविण्यासाठी विटांचे दर ठरवून द्यावेत, जेणेकरून घरकुल योजनेचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांना घरकुलांचे बांधकाम करता येईल. तहसीलदारांनी वीटभट्टी मालकांची मनमर्जी थांबवावी व प्रतिट्रॅक्टर-ट्राॅली सरासरी सहा हजार रुपये दर करून द्यावा, अशी मागणी बोपचे यांनी तहसीलदारांना केली आहे.