बाराभाटी : प्रत्येक शेतकऱ्याने आपल्या शेतात पिकांची माहिती ई-पीक पाहणी ॲपमध्ये भरावयाची आहे; परंतु ई-पीक नोंदणी करण्यात ग्रामीण क्षेत्रांमध्ये शेतकऱ्यांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे शेतकरी कंटाळले असून तलाठ्याकडूनच पीक पाहणी करावी, अशी मागणी येरंडी ग्रामपंचायत सदस्य कैलास इस्कापे यांनी केली आहे.
शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये अद्याप चुकारे जमा झाल्याने त्यांच्यात रोष निर्माण झाला आहे. रबी धानाचे चुकारेसुद्धा अनेक शेतकऱ्यांना मिळणे बाकी आहे. शेतकऱ्यांनी सावकारांकडून कर्ज घेतले आहे. अशात त्यांच्याकडे पैसे नसल्याने ते मोबाइल खरेदी कसे करणार, कमीत कमी ७५ टक्के शेतकऱ्यांकडे मोबाइल नाही अशात ई-पीक पाहणी कशी करावी, हा प्रश्न निर्माण झाला आहे. ई-पीक पाहणी ॲपद्वारे पिकांची नोंदणी करतानासुद्धा अनेक अडचणी निर्माण होत आहेत. पिकांची माहिती भरताना पिकांची माहिती कशी भरावी, हे अनेक शेतकऱ्यांना त्याचप्रमाणे कायम पड क्षेत्राची नोंदणी, बांधावरील झाडांची नोंदणी करतानासुद्धा अनेक अडचणी निर्माण होत आहेत. ई-पीक पाहणी सामान्य शेतकऱ्यांना भरणे शक्य नाही. त्यांच्याकडे स्मार्ट ॲण्ड्रॉइड मोबाइल असला तरीही अनेक ठिकाणी ॲपमध्ये त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. ई-पीक पाहणी प्रक्रियेमध्ये अनेक अडचणी सर्व्हेच्या वेळी निर्माण होत आहेत. त्यासाठी ई-पीक पाहणी तलाठ्यांकडूनच करावी, अशी मागणी इस्कापे यांनी केली आहे.