लोकमत न्यूज नेटवर्कनवेगावबांध : येथील प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी कार्यालयात आ. मनोहर चंद्रिकापुरे यांच्या उपस्थितीत संयुक्त वन व्यवस्थापन समितीची आढावा बैठक सोमवारी (दि.२४) घेण्यात आली.बैठकीला उपवनसंरक्षक कुलराज सिंह, प्रकाष्ठ निष्कासन अधिकारी डी.व्ही राऊत, वनपरिक्षेत्र अधिकारी आर.आय. दोनोडे, क्षेत्र सहायक एन.के. सरकार, वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिरूद्ध शहारे, माजी जिल्हा परिषद सदस्य किशोर तरोणे, उपसरपंच रघुनाथ लांजेवार, सतीश कोसरकर, बाबुलाल नेवारे, रामदास बोरकर, खुशाल काशीवार उपस्थित होते. आढावा बैठकीमध्ये नवेगावबांध पर्यटन संकुल परिसराच्या विकासासाठी विविध मुद्यांवर चर्चा करण्यात आली. संकुल परिसराच्या विकासासाठी वन्यजीव विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा दुर्लक्षितपणा आड येत असल्याचा आरोप रामदास बोरकर यांनी केला. यावर चंद्रिकापुरे यांनी दूरध्वनीवरून वन्यजीव विभागाचे रामानुजन यांच्याशी चर्चा केली. नवेगावबांध पर्यटन संकुल परिसराच्या विकासासाठी एक संयुक्त बैठक संबंधित विभागाच्या सर्व अधिकाऱ्यांसोबत आयोजित करून स्वयं स्पष्ट आराखडा तयार करण्याचे निर्देश देण्यात येतील असे चंद्रिकापुरे यांनी सांगितले. संयुक्त वन व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष अनिरुद्ध सहारे यांनी संयुक्त वन व्यवस्थापन समितीच्या बैठकीतील ठरावाची प्रत ज्यामध्ये नवेगावबांध संकुल परिसराचा विकास करण्याबाबतचे घेतलेले निर्णय अंतर्भूत होते ते सादर करण्यात आले. त्यावर हे मुद्दे सर्वांच्या सहमतीने लवकर कसे निकालात काढण्यात येतील यावर चर्चा झाली. बोरकर यांनी नवेगावबांध पर्यटन संकुल विकासाकरिता संजय कुटी परिसरापर्यंत मिनी ट्रेनची व वाटर स्पोर्ट एडवेंचर स्पोर्ट, जीप लाईन, तलाव किनाऱ्याचे सुशोभीकरण व संकुल परिसरातील महसूल विभागाच्या जागेवर डोमेस्टिक बोर्डचे झू बनविण्यात यावे अशी भूमिका मांडली. जेणेकरून पर्यटन विकास साधून पर्यटकांची संख्या वाढण्यास मदत होईल व स्थानिक बेरोजगारांना रोजगार मिळेल असे सांगीतले.यावर आ.चंद्रिकापुरे यांनी सकारात्मक भूमिका घेत पावसाळी अधिवेशन संपल्यानंतर नवेगावबांध येथे एका बैठकीचे आयोजन करून व मंत्र्यांशी भेटून या परिसराच्या विकासासाठी जास्तीत जास्त निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले. बैठकीत विविध विषयांवर चर्चा करण्यात आली.
पर्यटन संकुल परिसराच्या विकासाकरिता आढावा बैठक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2020 5:00 AM