गोंदिया : तालुक्यातील बिरसी येथील विमानतळावर लवकरच प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होणार आहे. याच अनुषंगाने खा. सुनील मेंढे यांनी शुक्रवारी (दि. १८) बिरसी विमानतळाला भेट देऊन आढावा घेतला. यावेळी त्यांनी नागरी उड्डयन महासंचालकांशी चर्चाही केली.
बिरसी येथे आंतरराष्ट्रीय दर्जाचा विमानतळ आहे. सन २००५मध्ये हा विमानतळ अस्तित्त्वात आला. मात्र, या विमानतळावरून अद्याप प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ झालेला नाही. सध्या या विमानतळावर मंत्री, विशिष्ट मान्यवरांची विमाने उतरतात. मात्र, तब्बल १५ वर्षांच्या कालावधीनंतर बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. दिल्ली येथील खासगी विमान कंपनी फ्लाय बिगने या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ करण्याचे कंत्राट घेतले आहे. येत्या महिनाभरात गोंदिया - इंदोरा - हैद्राबाद या प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ होणार आहे. गोंदिया, भंडारा आणि लगतच्या मध्यप्रदेश, छत्तीसगडमधील प्रवाशांसाठी सुध्दा ते सोयीचे होणार आहे. याच अनुषंगाने आढावा घेण्यासाठी खा. सुनील मेंढे यांनी शुक्रवारी बिरसी विमानतळाला भेट दिली. यावेळी सर्वेक्षणासाठी त्या ठिकाणी नागरी उड्डयन महासंचालक दीपा सक्सेना आल्या होत्या. त्यांच्याशीही खासदारांनी विमानतळाच्या सोयी, सुविधा आणि अन्य विषयांवर चर्चा केली. विमानतळावरून लवकर वाहतूक व्हावी, यादृष्टीने प्रयत्न व्हावेत, अशी सूचना खा. सुनील मेंढे यांनी केली. यावेळी विमानतळ संचालक विनय ताम्रकार, गजेंद्र फुंडे व अधिकारी उपस्थित होते.