गोंदिया : स्वतंत्र विदर्भ राज्याच्या निर्मिसाठी नागरिकांचा जास्तीत जास्त सहभाग मिळावा यासाठी ‘जनमंच’ या संघटनेच्या वतीने ‘लढा विदर्भाचा’ ही मोहीम राबविली जात आहे. स्थानिक शासकीय विश्रामगृहात रविवारी त्यासाठी जनजागृतीपर सभा पार पडली. यात स्वतंत्र विदर्भ राज्यासाठी येत्या ९ आॅगस्ट या क्रांती दिनी संपूर्ण विदर्भात ‘रेल देखो-बस देखो’ हे आंदोलन करण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला.याप्रसंगी नागपूरवरून आलेले जनमंचचे सल्लागार चंद्रकांत वानखेडे, विदर्भस्तरीय अध्यक्ष अॅड.अनिल किलोर, सचिव प्रमोद पांडे, उपसचिव राम आखरे, प्रा. शरद पाटील, प्रकाश इटनकर, सदस्य किशोर गुल्हाने, श्रीकांत दौड, टी.बी. जगताप, श्रीरसागर, विनोद बोरकुरे, तेजस केने, राहुल जडे, भगवान राठी, कृ.द. दाभोळकर प्रामुख्याने उपस्थित होते. तसेच जिल्ह्याच्या विविध भागातून आलेले पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थित मान्यवरांनी आपल्या मार्गदर्शनात स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण झाल्याशिवाय विदर्भातील जनतेचा विकास होऊ शकणार नाही, असे सांगत वेगळ्या विदर्भाची मागणी कशी रास्त आहे हे पटवून दिले. केंद्रात सत्ताबदल झाला आहे. नवीन सरकार लहान राज्यांच्या निर्मितीसाठी अनुकूल आहे. १९९७ मध्ये त्यांनी भुवनेश्वरच्या पक्ष अधिवेशनात स्वतंत्र विदर्भ राज्याचा ठरावदेखील केला आहे. त्या ठरावाची अंमलबजावणी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पूर्वी व्हावी, अशी विदर्भवासीयांची अपेक्षा आहे. ‘आधी विदर्भ, मगच निवडणुका’ अशी जनभावना असल्याचे नेत्यांनी सांगितले.जनमंचचे दाभोळकर व आखरे यांनी स्वतंत्र विदर्भाच्या प्रश्नावर अमरावती, नागपूर, चंद्रपूर व यवतमाळ येथे झालेल्या जनमत चाचणीद्वारे जनमत विदर्भवासीयांचे मत स्पष्ट झाल्याचे सांगितले. लाखो लोकांनी मतदानात भाग घेतला. यात ९७ टक्के लोकांनी स्वतंत्र विदर्भ राज्याच्या बाजूने मतदान केल्याचे यावेळी सांगण्यात आले. ९ आॅगस्टच्या ‘रेल देखो-बस देखो’ आंदोलनात रेल्वे प्लॅटफॉर्मवर व जेथे रेल्वेस्थानक नाही तिथे एस.टी.च्या प्रमुख बस स्थानकांवर नागरिक सकाळी ११ ते सायंकाळी ४ वाजतापर्यंत एकत्र येतील व त्यादरम्यान येणाऱ्या-जाणाऱ्या प्रवाशांना स्वतंत्र विदर्भ राज्याचा ‘विदर्भ बंधन धागा’ बांधतील असे यावेळी सांगण्यात आले.स्वतंत्र विदर्भ राज्याची निर्मिती झाली तरच सर्व समस्या आपोआप सुटल जातील व आम्हाला जनतेच्या समस्या सोडविण्यासाठी प्रयत्न करणेही सोपे जाईल. विदर्भातील साधन संपत्तीचा लाभ विदर्भवासीयांना घेता येईल, असे सांगून विधानसभा निवडणुकीपूर्वी स्वतंत्र विदर्भ राज्य निर्माण करावे, अशी जोरदार मागणी यावेळी करण्यात आली.(प्रतिनिधी)
स्वतंत्र विदर्भासाठी क्रांतिदिनी ‘रेल देखो-बस देखो’ आंदोलन
By admin | Published: July 27, 2014 11:48 PM