अंकुश गुंडावार
गोंदिया : धानाचे उत्पादन नसलेल्या जिल्ह्यांतून धानाची भरडाई होऊन तांदूळ थेट गोंदिया जिल्ह्यात येत आहे. वाचायला जरी हे नव्वल वाटले तरी हे शक्य आहे. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध याेजनेंतर्गत रेशनकार्डधारकांना वाटप केलेे जाणारे धान्य काही लाभार्थी विक्रेत्यांना विक्री करीत आहे. तर हा तांदूळ हे विक्रेत मोठ्या विक्रेत्यांना विक्री करीत असून ते या तांदळाची राईस मिलर्सला विक्री करीत असल्याची बाब पुढे आली. त्यामुळेच मागील आठवडाभरापासून जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात बाहेरील जिल्ह्यातील रेशनचा तांदूळ येत आहे. मात्र याकडे कुणाचेच लक्ष नाही.
पूर्व विदर्भातील गोंदिया, भंडारा, गडचिरोली, चंद्रपूर, नागपूर या जिल्ह्यांत सर्वाधिक धानाची लागवड केली जात आहे. शेतकऱ्यांना हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. खरेदी केलेला धान राईस मिलर्ससह करार करून भरडाई केला जातो. त्यानंतर सीएमआर तांदूळ शासनाकडे जमा केला जातो. त्यानंतर अन्न व पुरवठा विभागाच्या सूचनेनुसार राज्यातील विविध स्वस्त धान्य दुकानांना पुरवठा केला जातो. सद्य:स्थितीत गोंदिया जिल्ह्यातून लातूर, परभणी, नाशिक, औरंगाबाद, नंदुरबार, उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये तांदूळ पाठविला जात आहे. ज्या जिल्ह्यात तांदूळ पाठविला जात आहे त्या जिल्ह्यातील एका गुणवत्ता नियंत्रकांना गोंदिया येथे पाठविले जाते. ते आपल्या जिल्ह्यात जाणारा तांदूळ चांगला आहे किंवा नाही याची तपासणी करतात. त्यानंतर गुदामातून हा तांदूळ रवाना केला जातो. ही सर्व प्रक्रिया अशी चालते. एवढी पारदर्शक प्रक्रिया सुरू असताना रेशनच्या तांदळाचे रिसायकलिंग कसे होते, हा संशोधनाचा विषय आहे.
......
असा उघडकीस आला प्रकार
धानाचे उत्पादन नसलेल्या वाशिम जिल्ह्यातून एक ट्रक तांदूळ दोन दिवसांपूर्वी सौंदड येथे दाखल झाला. त्या ट्रकचालकाला विचारणा केली असता वाशिम जिल्ह्यातून तांदूळ भरून आणल्याचे सांगितले. त्यामुळे आश्चर्य वाटले. गोंदिया जिल्ह्यातून इतर जिल्ह्यात तांदूळ जात असताना वाशिम जिल्ह्यातून तांदूळ कसा येत आहे याची माहिती काढली तर हे रेशनचे तांदूळ असून हे तांदूळ काही राईस मिलर्स खरेदी करीत असल्याची बाब पुढे आली. १४ रुपये प्रतिकिलो दराने हा तांदूळ खरेदी केला जात असून, या तांदळाचे रिसायकलिंग करून तो नवीन कट्ट्यात भरून शासनाकडे जमा केला जात असल्याची माहिती आहे.
................
भरडाई केलेला तांदूळ जातो कुठे?
जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलल्या धानाची राईस मिलर्ससह करार करून भरडाई करून तांदूळ जमा केला जातो. मात्र खरेदी केंद्रावरून ज्या धानाची उचल केली तोच धान भरडाई करून परत केला जातो का, याची पडताळणी होण्याची गरज आहे. तसे केल्यास बऱ्याच गोष्टी स्पष्ट होतील. शिवाय केंद्रावरून उचल केलेला धान उष्णा राईस तयार करून बाहेर देशात पाठविला जात असल्याची माहिती आहे.
...........
कोट
बाहेरील जिल्ह्यांतून गोंदिया जिल्ह्यात रेशनचा तांदूळ येत असेल तर ही गंभीर बाब आहे. याची माहिती किवा तक्रार दिल्यास निश्चित कारवाई केली जाईल.
- डी. एस. वानखेडे, जिल्हा पुरवठा अधिकारी, गोंदिया