सुरेंद्र भांडारकर
मुंडीकोटा : परिसरात शेतकऱ्यांची संख्या फार मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळे शेती करणे हा त्यांचा मुख्य व्यवसाय आहे. वर्षभर शेतीचे कामे करुन आपला उदरनिर्वाह करीत असतात. या महागाईच्या युगात शेती करणे परवडत नाहीत, असे शेतकऱ्यांकडून बोलले जाते. यावेळी काही शेतकरी आपली शेती ठेका, बटई देतात तर अनेक शेतकरी स्वत:च शेतीची कामे करीत असतात. यावर्षी बी-बियाणे, ट्रॅक्टर तसेच मजुरीचे दर गगणाला भिडल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे.
पैसा खर्च करुन शेतीसाठी वेळेवर मजूर मिळत नाहीत अशी परिस्थिती शेतकऱ्यांवर आली आहे. स्वत: राबेल त्यांची शेती, असे पूर्वीचे वृध्द म्हणत होते. ही बाब सत्य आहे. रात्रंदिवस शेतकरी काबाडकष्ट करुन आपल्या शेतीत राबत असतो. कधी-कधी शेतकऱ्यांवर अतिवृष्टी, पूर, अपुरा पाऊस यामुळे हाती आलेले पीक गमविण्याची वेळ येते. बळीराजा अनेक संकटाला तोंड देत असते. पण शेती करणे सोडत नाहीत. त्यातच वर्षभराचा खर्च लग्न, मुला-मुलींचे शिक्षण व इतर खर्च यात शेतकऱ्यांचे कंबरडे मोडत असतात. मुंडीकोटा परिसरात खरीप हंगामापाठोपाठ रब्बी धानाची लागवड केली जाते. शेतकऱ्यांनी हमीभावापेक्षा कमी दर मिळू नये, यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्र्गत शासकीय धान खरेदी केंद्राच्या माध्यमातून धान खरेदी केली जाते. मात्र यंदा रिकामी नसल्याने खरेदी केलेला धान ठेवायचा कुठे असा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे रब्बीच्या धान खरेदीचा गोंधळ कायम आहे.
......
शेतकऱ्यांना बसतोय आर्थिक भुर्दंड
मुंडीकोटा येथे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन यांनी विविध सेवा सहकारी संस्था मुंडीकोटा यांना खरीप हंगामासाठी धान खरेदी केंद्र देण्यात आले होते. येथील शासकीय गोदाम व सेवा सहकारी गोदाम हे दोन्ही गोदाम पूर्ण भरलेले आहेत. शासनाचे त्या मालाची अजून उचल केली नाही. परिणामी शेतकरी हा अडचणीत सापडलेला आहे. मुंडीकोटा परिसरातील धान (तिरोडा) खमारी या केंद्रावर नेण्याचा सल्ला संस्था चालक हे शेतकऱ्यांना देत असते. पण मुंडीकोटा ते खमारी अंतर येथून २० किमी आहे. ट्रॅक्टर भरुन नेणे व भाडा देणे आणि काटा होईपर्यंत थांबणे हे शेतकऱ्यांना परवडण्यासारखे नाहीत.
....
अधिक उत्पादन होवूनही नुकसान
शेतकऱ्यांची रब्बी धानाची चुरणी व मळणी झाली. त्यामुळे शेतकऱ्यांनी ते धान आपल्या घर आणून ठेवले आहेत. व्यापारी कमी दरात धान खरेदी करुन शेतकऱ्यांची पिळवणूक करीत आहेत. अनेक शेतकऱ्यांकडे धान ठेवण्याकरीता जागा नाहीत,त्यांनी काय करावे,असा प्रश्न निर्माण झाला आहे. पिकेल तर विकेल पण काय? अधिक उत्पादन होऊन सुध्दा शेतकऱ्यांचे नुकसान सहन करण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे.