लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गतवर्षीच्या उन्हाळ्यात उष्णतेमुळे ई-बाइक (इलेक्ट्रिक वाहन) पेटण्याच्या घटना घडल्या होत्या. यंदा अशा संभाव्य घटनांना आळा घालण्यासाठी वाहनचालकांनी आवश्यक ती काळजी घेणे अत्यावश्यक आहे, असा सल्ला उपप्रादेशिक परिवहन विभागाने दिला आहे.
जिल्ह्यात ई-बाइक वापरणाऱ्यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामध्ये परिवहन विभागाची नोंदणी अनिवार्य असलेल्या व नोंदणीतून सूट मिळालेल्या ई-बाइकचा समावेश आहे. बॅटरीची क्षमता २५० वॉटपेक्षा कमी असलेल्या, तसेच ज्या वाहनांची वेगमर्यादा ताशी २५ किलोमीटरपेक्षा कमी आहे, अशा ई-वाहनाला नोंदणीतून सूट आहे.
नोंदणीतून सूट असलेल्या या ई-वाहनाच्या बॅटरी व वायरिंगबाबत गतवर्षी काही तक्रारी होत्या. अशा ई-वाहनात विनापरवानगी केलेले बदल हे स्फोट होण्यास किंवा अन्य दुर्घटनांना कारणीभूत ठरू शकतात, असे तज्ज्ञ सांगतात. अशा ई-बाइकमध्ये अनधिकृत बदल करू नये, असा इशारा परिवहन विभागाने दिला आहे.
ई-बाइक घेताना कोणत्या गोष्टी तपासाल?
- प्राधिकृत संस्थेने मान्यता दिलेल्या मानकांप्रमाणे ई-वाहन असल्याची खातरजमा करावी. वाहन वितरक व उत्पादक यांच्याकडे मान्यताप्राप्त संस्थेचा आणि परिवहन आयुक्त कार्यालयाने जारी केलेल्या परवानगीची प्रत आहे की नाही, हे तपासावे.
- नोंदणीतून सूट असलेल्या ई-बाइकची बॅटरी क्षमता २५० वॉटपेक्षा अधिक नसावी. ही बॅटरीनंतर बदलता येईल का, याची माहिती घ्यावी. वेगमर्यादा तपासून घ्यावी.
त्या' वाहनाला परवान्याची गरज नाही !२५० वॉटपर्यंत बॅटरी क्षमता आणि प्रति तास २५ किलोमीटरपेक्षा कमी वेग असलेल्या इलेक्ट्रिक वाहनाला उपप्रादेशिक परिवहन विभागात पासिंगची गरज नसते. अशा वाहनासाठी वाहनचालक परवान्याची आवश्यकता नसते.
"उन्हाळ्यात इलेक्ट्रिक वाहनांची विशेष खबरदारी घ्यावी. प्राधिकृत संस्थेने मान्यता दिलेल्या मानकांप्रमाणे ई-बाइक घेतली जात आहे का, याची खातरजमा करावी. तसेच, ई-बाइकमध्ये विनापरवानगी कोणताही बदल करू नये."- राजेंद्र केसकर, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी, गोंदिया