राजेश मुनीश्वर
सडक अर्जुनी : तालुक्यातील आत्ता सर्वच नदी नाले कोरडे पडले असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे.
तालुक्यातील दल्ली, रेंगेपार, सौंदड, पांढरी, घाटबोरी, डव्वा, कोकणा जमी, कोहमारा, सालेधरणी, पुतडी, जांभळी, कोदामेढी, सडक अर्जुनी, वडेगाव, आदी ठिकाणांवर आलेलले नदी नाले पूर्ण कोरडे पडले आहेत. प्रशासनाने फेब्रुवारी महिन्यात बंधाऱ्यांना पाट्या लावल्या असत्या तर तालुक्यात भरपूर पाणीसाठा शिल्लक राहिला असता मात्र अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष झाल्याने लाखो लिटर पाणी वाहून गेले.
तालुक्यात बांधलेले कोल्हापुरी बंधारे आत्ता निकामी झाले आहेत. वडेगाव, दल्ली, रेंगेपार, कनेरी, केसलवाडा, डव्वा, पांढरी, माउली, राका, येथील कोल्हापुरी बंधाऱ्यांची दुरवस्था झाली आहे. या बंधाऱ्यांची डागडुजी केल्यास लाखों लिटर पाणी जलसाठा तालुक्याला उपलब्ध होऊ शकतो. पाणीसाठा उपलब्ध झाल्यास वन्य व पाळीव प्राण्यांना पिण्याच्या पाण्याची सोय हमखास होईल. तसेच शेतीला सिंचनाची सोय होईल. त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक प्रगती करण्यास हातभार लागेल. तालुक्यातील सडक अर्जुनी गावाजवळून वाहणाऱ्या उमरझरी नाल्याला मध्यम प्रकल्पाचे पाणी सोडण्याची नितांत गरज आहे. नदीला पाणी सोडल्याने वन्य व पाळीव प्राण्यांना सुद्धा पिण्याच्या पाण्याची सोय होईल. सडक अर्जुनी तालुक्याला लागून नवेगाव-नागझिरा अभयारण्य असल्यामुळे वनातील प्राणी आत्ता गावाच्या दिशेने पाण्याचे शोधात भटकंती करीत आहेत. नदी-नाल्यांना पाण्याची सोय असती, तर प्राणी गावाकडे आले नसते.
सडक अर्जुनी तालुक्यातील कोल्हापुरी बंधारे बांधण्यासाठी लाखों रुपये खर्च करण्यात आले. आलेल्या पावसाचे पाण्याने फुटलेल्या बंधाऱ्याची डागडुजी करण्याची गरज आहे. यासाठी अधिकारी, पदाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची वेळ आली आहे. पण कोणताही अधिकारी या समस्येकडे हेतूपुरस्पर दुर्लक्ष करीत नसतील तर नाही ना, असाही सवाल होत आहे.
.....
विविध पिकांची लागवड
सडक अर्जुनी तालुक्यातील भौगोलिक क्षेत्र ५५४६१.६३ हेक्टर असून, पिकाखाली क्षेत्र २५७८७ हेक्टर आहे. तर सिंचनाखाली एकूण क्षेत्र १२७०१ हेक्टर आर आहे. त्यात धान, उस, केळी, टरबूज, काकडी, भाजीपाला आदी पिके घेतली जातात.
.....
तालुक्यातील बंधाऱ्यात पाणीसाठा राहिला, असता तर हजारो हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येऊन विविध नगदी पिके हमखास घेतली जातात त्यामुळे शेतकऱ्याची आर्थिक परिस्थिती उंचावेल. वाहणाऱ्या नाल्यांवर बंधारे बांधण्याची गरज आहे.
- एफ.आर.टी. शहा, किसान आघाडी
सडक अर्जुनी
.....
सडक अर्जुनी तालुक्यातील चिखली परीसरात सिंचनाची सोय नाही. कोहमाराजवळून वाहणाऱ्या सशिकरन नाल्यावर बंधारा बांधून उपसा जलसिंचन योजना कार्यान्वित केल्यास चिखली परिसरातील शेतकरी सुजलाम सुफलाम झाल्याशिवाय राहणार नाही.
संगीता भरत ब्राह्मणकर, सामजिक कार्यकर्त्या
....