राजकुमार भगत
सडक-अर्जुनी : लवकरच होऊ घातलेल्या नगर पंचायतच्या निवडणुका लक्षात घेऊन प्रारूप मतदार याद्या सडक-अर्जुनी नगर पंचायतने १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केल्या. त्या याद्या पाहून अनेक नागरिकांना धक्काच बसला. काही प्रभागांमध्ये जास्त मतदार, तर काही प्रभागांमध्ये फारच कमी मतदार आहे, तर काही प्रभागांचे मतदार दुसऱ्याच प्रभागामध्ये दाखवि्ण्यात आले आहेत. ही प्रारूप यादी पाहून मतदारांमध्ये बराच गोंधळ उडालेला आहे.
सडक-अर्जुनी नगर पंचायतमध्ये एकूण १७ प्रभाग असून, एकूण मतदार संख्या ५ हजार ४३५ एवढी आहे. प्रत्येक प्रभागाची अंदाजे मतदार संख्या ३२० एवढी राहायला पाहिजे होती; परंतु नगर पंचायतने जवळपास समान मतदार ठेवण्याऐवजी प्रभाग क्रमांक १६ मध्ये एकूण मतदार ५२८ आहेत, तर प्रभाग क्रमांक ५ मध्ये ४४२ मतदार आहेत. प्रभाग क्रमांक १४ मध्ये एकूण मतदार १६२ आहेत. प्रभाग क्रमांक १२ मध्ये १७७, तर प्रभाग क्रमांक १३ मध्ये २२१ मतदार आहेत. अशा प्रकारचे प्रभागानुसार विषम मतदार असल्यामुळे गावकरी संतप्त दिसून आले. अनेक मतदारांचे नाव दोन ते तीन प्रभागांमध्ये दिसून येते, तर काही मतदार अशा प्रकारचे आहेत की नागरिक त्यांना ओळखत पण नाहीत. नगर पंचायतच्या निवडणुकीमध्ये फारच रंगत असते असे शेजारी गावांना वाटत असल्यामुळे अनेक शेजारच्या गावांचे मतदार नगर पंचायतच्या मतदार यादीमध्ये समाविष्ट झाल्याची चर्चा आहे.
अशा प्रकारच्या अनेक चुका असलेल्या प्रारूप मतदार याद्या नगर पंचायतने १५ फेब्रुवारी रोजी प्रसिद्ध केल्या. २२ फेब्रुवारीपर्यंत आक्षेप नोंदविण्याची वेळ असल्याने निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांनी आक्षेप नोंदविण्यासाठी (दि. २२) गर्दी केली होती. प्रत्येक प्रभागामध्ये जवळपास समान मतदार असावेत व बोगस मतदार कमी करावेत, अशी नगरवासीयांची मागणी आहे.