लोकमत न्यूज नेटवर्कतिरोडा : स्थानिक अदानी पावर प्लांट हे कोळशावर चालणारे असल्याने यात मोठ्या प्रमाणात राख तयार होते. ही राख मारेगाव रोडवर टाकत असल्याने त्या रस्त्याची दुर्दशा झाली व परिसरातील आरोग्य धोक्यात येत असून पुलाची नासधूस झाल्याने आपल्या स्तरावरुन कार्यवाही करण्याची विनंती ग्रामपंचायतने तहसीलदारांना केली. तर त्या पत्रावर कार्यवाही करताना अदानी पॉवर प्लांटला आपले म्हणने तीन दिवसात सादर करा अन्यथा फौजदारी प्रक्रिया संहिता १९७३ च्या कलम १३३ अन्वये कारवाई करण्यात येईल, असे पत्र तहसीलदार संजय रामटेके यांनी दिले.वडेगाव येथील मारेगाव रोडवर मागील महिन्यापासून अदानीतील राख वाहतूक करुन वैयक्तिक जनिनीवर घालणे सुरु आहे. यासंबंधी अदानीतर्फे जमीन मालकाची कोणतीही परवानगी किंवा नाहरकत प्रमाणपत्र न मागता वाहतूक केली आहे. त्यामुळे स्मशानघाटाकडे जाणारा मारेगाव रस्ता पूर्णत: उखडला असून जीर्ण झालेला आहे. तसेच एका पुलाची नासधूस ट्रकमुळे झालेली आहे. यामुळे परिसरातील आरोग्य धोक्यात आले आहे. योग्य कार्यवाही करण्याची विनंती सरपंच वडेगाव तुमेश्वरी बघेले यांनी तहसीलदारांना पत्राद्वारे केली आहे. तर त्यांच्या पत्रावरुन तहसीलदार संजय रामटेके यांनी अदानी पॉवर प्लांटला तीन दिवसात स्पष्टीकरण सादर करण्याचे पत्राद्वारे सूचित केले आहे. त्यात त्यांनी वडेगाव ग्रामपंचायतच्या पत्रानुसार आपणाकडून मारेगाव रस्त्यावरुन राखेची वाहतूक विनापरवाना करण्यात येत आहे. त्यामुळे रस्ता, पूल खराब झाले असून आरोग्यास धोका निर्माण झालेला आहे. त्यामुळे आपणाविरुद्ध फौजदारी प्रक्रिया संहिता अन्वये कारवाई करण्याचे प्रस्ताव वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे का सादर करण्यात येवू नये, असे कळविले आहे.
राख वाहतुकीमुळे रस्त्याची दुर्दशा
By admin | Published: June 02, 2017 1:29 AM