प्रशासनाचे दुर्लक्ष : रस्त्यासाठी वर्षानुवर्षांपासून पायपीटशेंडा (कोयलारी) : सडक अर्जुनी तालुक्यातील दल्ली ग्रामपंचायत अंतर्गत येणाऱ्या सलंगटोल्याचे आदिवासी स्वातंत्र्योत्तर काळातही रस्त्याविना जगत आहेत. वारंवार मागणी करुनही त्यांच्या पदरी निराशाच पडल्याने ते स्वत:ला दुर्दैवी मानत आहेत.सडकअर्जुनीवरुन फक्त नऊ कि.मी. अंतरावर असलेल्या सलंगटोला नावाचे गाव आहे. स्वातंत्र्यपूर्व काळापासून या गावात फक्त आदिवासी समाजाचे लोक वास्तव्याने राहतात. परंतु त्यांना आजही धुऱ्यापाळीने चालून आपल्या गरजा कराव्या लागतात हे वास्तव आहे.आपल्याला हक्काचा रस्ता मिळावा यासाठी येथील तरुण राजेश धुर्वे रस्त्याची मागणी वारंवार करीत आहेत. तरी प्रशासनाला जाग येत नसल्याचे विदारक स्वरुप सद्यस्थितीत दिसून येते.या जिल्ह्याचे पालकमंत्री सडक अर्जुनी तालुक्याचे असून त्यांच्या घरापासून या गावाचे अंतर केवळ नऊ कि.मी. आहे. हे गाव त्यांच्याच विधानसभा क्षेत्रात असूनही त्या गावाला जाण्या-येण्याचा मार्ग नाही. त्यामुळे त्यांच्या परिसरातील गावावर किती जवळीक असेल हे दिसून येते.या गावातील विद्यार्थी विद्यार्जनासाठी उशिखेडा, शेंडा, डोंगरगाव, (सडक) व तालुक्याच्या ठिकाणी जातात. पावसाळ्यात त्यांना कमालीचा त्रास सहन करावा लागतो. वेळ पडली तर रस्त्याअभावी चार-चार दिवस शाळेला बुट्टी मारावी लागते. वृद्धांची समस्या याहूनही बिकट आहे. पावसाळ्यात प्रकृती बिघडली तर वृद्धांना धुऱ्यापाळीने खाटेवर न्यावे लागते. एवढी बिकट समस्या असूनही प्रशासनाचे अधिकारी अथवा लोकप्रतिनिधी रस्त्याची दखल घेत नाही. यावरून तालुक्याच्या नकाशातून संलगटोल्याचे नाव वगळण्यात तर आले नसावे? अशी संका नागरिकांना येते.पंतप्रधान ग्राम सडक योजनेंतर्गत गाव तेथे रस्ता ही योजना राबविण्यात आली. मग सलंगटोल्यावर अन्याय का? असे एक ना अनेक प्रश्न उद्भवतात. निवडणूक काळात मोठमोठे नेते धुऱ्यापाळीने येऊन या गावाला भेट देतात. गावकरी मतदानाच्या बदल्यात रस्त्याची मागणी करतात. परंतु पाच वर्षाचा कार्यकाळ लोटूनही त्या गावाकडे ढुकूंनही लोकप्रतिनिधी पाहात नाही. स्वातंत्र्याची ६५ वर्षे उलटली तरीे सलंगटोलावासीयांनी अजूनही रस्त्याची सोय झाली नाही. अनेकदा निवेदन देऊनही त्यांना साधा रस्ता उपलब्ध झाला नाही. लोकप्रतिनिधींनी या सलंगटोलावासीयांच्या समस्येकडे लक्ष देण्याची मागणी आहे. (वार्ताहर)
सलंगटोल्यातील आदिवासी जगताहेत रस्त्याविना
By admin | Published: January 10, 2016 2:08 AM