सडक-अर्जुनी : कोहमारा-नवेगावबांध राज्यमार्ग क्रमांक - २७९ चे काम मागील दोन वर्षांपासून मंदगतीने सुरू आहे. त्यामुळे या मार्गाने जाणाऱ्या नागरिकांना कमालीचा त्रास सहन करावा लागत आहे. या मार्गाचे काम चालू असल्याने अर्धा मार्ग वाहतुकीसाठी मोकळा सोडण्यात आला आहे. मात्र, मार्ग अरुंद असल्याने अपघातांची शक्यता बळावली आहे. या मार्गाचे काम लवकर पूर्ण करावे, अशी मागणी होत आहे.
या रस्ता बांधकामांतर्गत अर्ध्या रस्त्याचे काम सुरू असून, अर्धा रस्ता वाहतुकीसाठी सोडण्यात आल्याने रस्ता अरुंद झाला आहे. अशात ग्राम चिखली येथे नवेगावबांधकडून कोहमाराकडे येणारी बस व कोहमाराकडून नवेगाव बांधकडे जाणाऱ्या ट्रकची आपसांत धडक झाली. सुदैवाने या अपघातात काही हानी झाली नाही. मात्र, या मार्गावर मोठे अपघात घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. या मार्गावर सिमेंट नाला व मार्गाचे काम चालू आहे. अशात संबंधितांकडून या बांधकामावर पाणी टाकले जात नसल्याची ओरड आहे. रस्त्यांच्या बांधकामासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी मंजूर केला जातो. मात्र, अधिकाऱ्यांच्या हलगर्जीपणामुळे निकृष्ट दर्जाचे बांधकाम केले जाते व ते अल्पकाळात जमीनदोस्त होतात. काही महिन्यांपूर्वी आमदार मनोहर चंद्रिकापुरे यांनी या मार्गाच्या अभियंता व कंत्राटदाराला समज दिली होती. त्यानंतरही काहीच सुधारणा झाल्याचे दिसत नाही. याच मार्गावरील चिखली गावाजवळ मुख्य मार्गावर खोदकाम केल्यामुळे काही ठिकाणी खड्डे तयार झाले आहेत. अशात रात्रीला वाहनधारक पडल्याच्या अनेक घटना घडल्याचे माजी ग्रामपंचायत सदस्य युवराज वालदे यांनी सांगितले. त्यामुळे या मार्गाचे काम लवकर करावे, अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केली आहे.