गांधीटोला रस्ता : अधिकाऱ्यांचे कंत्राटदाराला पाठबळ साखरीटोला : साखरीटोला-सातगाव-गांधीटोला रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे केले जात असून सदर बांधकाम बंद करुन कामाची उच्च स्तरीय चौकशी करण्यात यावी, अशी मागणी ग्रामपंचायत सातगाव व गावकऱ्यांनी वरिष्ठांकडे निवेदनातून केली आहे.भारत निर्माण प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेंतर्गत महाराष्ट्र राज्य ग्रामीण रस्ते विकास संस्थेद्वारा साखरीटोला-सातगाव-गांधीटोला ते तिरखेडी रामा ३६३ (आर.टी.१०) रस्ता डांबरीकरणाचे काम सध्या सुरू आहे. सदर कामाची लांबी ६ हजार ५४० मी. आहे. सदर कामाची अंदाजपत्रकीय किंमत २५१.६३ लक्ष रुपये असून निविदेची किंमत २०५.६७ लक्ष आहे. काम पूर्ण झाल्यानंतर कंत्राटदारामार्फत ५ वर्षापर्यंत देखभाल व दुरुस्तीची हमी घेण्यात आली असून काम पूर्ण करण्याची तारीख २४ सप्टेंबर २०१५ ते २३ सप्टेंबर २०२० पर्यंत आहे.सदर बांधकाम गोरेगाव येथील लक्ष्मी कन्स्ट्रक्शन कंपनीला असून सदर मार्गाचे बरेच काम पूर्णत्वाला आले असून बांधकामात मोठ्या प्रमाणात निकृष्ट साहित्याचा वापर करण्यात आल्याचा आरोप गावकऱ्यांनी केला आहे. यासंबंधी अनेकदा वरिष्ठांकडे तक्रार करण्यात आली. सध्या रस्त्यावर डांबराचा थर देणे सुरु आहे. प्रस्तावित कामाच्या तपशिलानुसार इमलसन कोट (एस.एच.१) २०.७७ में. टन इमलसन कोट (रु) १२.२२ में टन पुर्वीच निधीत कारपेट २० मि.मि. जाड ६६० घन.मी. तर प्रिमीक्स सिलकोट १४७ घन मी. आहे. मात्र प्रस्तावित अंदाजपत्रकानुसार काम होत नाही. असे प्रत्यक्ष काम पाहिल्यानंतर लक्षात येते, ग्रा.पं.चे पदाधिकारी, सदस्य व गावकऱ्यांनी प्रत्यक्ष सदर कामाला भेट देऊन निकृष्ट दर्जाचे काम सुरू असल्याची माहिती उपअभियंता कापगते यांना दिली. त्यांनी काम पाहिल्यानंतर निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे मान्य केले. तरी कंत्राटदाराला काम सुरु ठेवण्यास परवानगी दिली व गावकऱ्यांच्या तक्रारीची कोणतीही दखल घेतली नाही असा आरोप ग्रा.पं. तसेच गावकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे सदर बांधकामाची योग्य तपासणी करुन उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी ग्रा.पं.सातगाव व गावकऱ्यांनी निवेदनातून जिल्हाधिकाऱ्यांना केली आहे. तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे चंद्रकांत पाटील, राज्य परिवहन मंत्री, पालकमंत्री राजकुमार बडोले, आमदार संजय पुराम, जि.प. अध्यक्ष उषा मेंढे, मुख्य कार्यकारी अधिकारी तसेच उपअभियंता कापगते यांना निवेदन पाठविण्यात आले आहे. प्रधानमंत्र्याच्याच योजनेला डच्चूप्रधानमंत्र्यांच्या नावानेच सुरू असलेल्या सडक योजनेंतर्गत तयार होत असलेल्या रस्त्याचेच काम निकृष्ट होत आहे. यातून बांधकाम विभागाचे अधिकारी व कंत्राटदार प्रधानंत्र्यांच्याच योजनेला डच्चू देत असल्याचा हा प्रकार दिसून येत आहे. रस्त्यांचा विकास करणे सोडून रस्त्यांचे थातूरमातूर काम करून आपला विकास साधण्याचे काम अधिकारी व कंत्राटदार करीत असल्याचेही गावकरी बोलत आहेत.
रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे
By admin | Published: June 12, 2016 1:37 AM