लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वाढत्या अतिक्रमणामुळे अरूंद असलेले शहरातील रस्ते आणखीच अरूंद होत चालले आहेत. अशात या अतिक्रमणवर आळा घालता यावा व रस्ते मुक्त करता यावे यासाठी नगर परिषद, वीज वितरण विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा यांनी एकत्र येत संयुक्तरित्या मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत बुधवारी (दि.१६) शहरातील मनोहर चौक ते नेहरू पुतळा मार्गावर दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण काढण्यात आले. शहरात अतिक्रमणची समस्या गंभीर असून अतिक्रमणमुळे अगोदरच अरूंद असलेले रस्ते आणखीच अरूंद झाले आहेत. परिणामी वाहतुकीला त्रास होत असून यातूनच कित्येकदा अपघात घडतात. मध्यंतरी जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना यांनी घेतलेल्या बैठकीत शहरातील अतिक्रमणचा मुद्दा चांगलाच गाजला होता. अशात हे अतिक्रमण काढण्याचेही ठरले होते. त्यानुसार, नगर परिषद, वीज वितरण कंपनी, सार्वजनिक बांधकाम विभाग, वाहतूक नियंत्रण शाखा यांनी संयुक्तरित्या मोहीम राबविली. या मोहिमेंतर्गत बुधवारी (दि.१६) शहरातील मनोहर चौक ते जयस्तंभ चौक व तेथून म्युनिसिपल शाळेपर्यंत रस्त्याच्या दोन्ही बाजूला असलेले अतिक्रमण काढण्यात आले. यामुळे आता रस्ते अतिक्रमणात गेलेले रस्ते व फुटपाथ मोकळे झाले आहे. जिल्हाधिकारी मीना व पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्या मार्गदर्शनात राबविण्यात आलेल्या मोहिमेत नगर परिषद मुख्याधिकारी करण चव्हाण, नगर परिषद अभियंता डॉली मदान, उप अभियंता अनिल दाते, रविंद्रनाथ कावडे, मनिष जुनघरे, वीज अभियंता मोनिका वानखेडे, नगर रचनाकार सागर मोगरे, प्रतीक नाकाडे, सौरभ कावळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अभियंता खोब्रागडे, आवडे, वाहतूक नियंत्रण शाखेचे निरीक्षक दिनेश तायडे व या विभागांच्या यंत्रणांनी भाग घेतला होता.
नागरिकांच्या सहकार्याची गरज रस्त्यांवर वाढत असलेल्या अतिक्रमणमुळे नागरिकांना वाहतुकीला त्रास होतो. कधी-कधी यामुळे अपघातही घडत असून अप्रिय घटनांची शक्यता नाकारता येत नाही. यामुळे नागरिकांनी रस्त्यांच्या कडेला अतिक्रमण करू नये व प्रशासनाला सहकार्य करावे असे जिल्हाधिकारी दीपक कुमार मीना, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांच्यासह संबंधीत सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी कळविले आहे.