एफडीएचा कारभार : प्रभारी अधिकाऱ्यांमुळे आरोग्य धोक्यात गोंदिया : गणेशोत्सवाच्या काळात मोठ्या प्रमाणात मिष्ठान्नांची मागणी वाढते. त्यामुळे भेसळीचा कारभार फोफावतो. यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी अन्न व औषध प्रशासन विभागाची आहे. मात्र भेसळीसाठी कुप्रसिद्ध असणाऱ्या गोंदियात यावर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक असणारे अन्न व औषध प्रशासन विभागाचे कार्यालय अजूनही गोंदियात स्थानांतरित करण्यात आलेले नाही. त्यामुळे भेसळखोरांना पुन्हा एकदा उत्सवाच्या काळात रान मोकळे झाले आहे.भंडारा येथून चालणाऱ्या या विभागाचा कारभार गोंदिया जिल्ह्यात प्रभारी अधिकाऱ्यांच्या खांद्यावर आहे. त्यामुळे आहे ते दिवस मागे टाकावे असाच त्यांचा पवित्रा असतो. त्यातही गेल्या अनेक दिवसांमध्ये त्यांनी गोंदियात कोणावरही कारवाई केलेली नाही. त्यामुळे भेसळखोरांशी त्यांचे लागेबांधे तर नाही, अशी शंका व्यक्त केली जात आहे.गोंदिया जिल्हा निर्मितीला आता १५ वर्षे झाली आहे. तरीही येथे अन्न व औषध विभागाचे स्वतंत्र कार्यालय लाभलेले नाही. भेसळखोरांचा कारभार राजरोसपणे चालत राहावा यासाठीच हे कार्यालय गोंदियात येऊ दिल्या जात नसल्याचीही शंका आता व्यक्त केली जात आहे. सध्या भंडारा येथील उपायुक्तांकडेच गोंदियाचाही कारभार आहे. गोंदियात केवळ नाममात्र कार्यालय उघडण्यात आले असून भंडारा येथील एक कर्मचारी फक्त परवान्यांचे नुतनीकरण व अन्य कार्यालयीन कामांसाठी येथे येतो. अन्न व औषध या दोन्ही शाखांचे अधिकारी आजही प्रभारी तत्वावरच येथे येतात. आजघडीला अन्न शाखा बघायची झाल्यास, सहायक आयुक्त यांच्याकडेच गोंदियाचाही प्रभार सोपविण्यात आला आहे. त्यांनी काळे व देवरी हे दोन अन्न सुरक्षा अधिकारी गोंदियासाठी नियुक्त केले आहेत. यातील देवरे यांच्याकडे पाच तर काळे यांच्याकडे तीन तालुके देण्यात आले आहेत. वास्तविक या दोघांकडे भंडारा जिल्हा असून गोंदिया जिल्ह्याचा प्रभार असल्याने ते ही दोन-तीन दिवसाआड गोंदियाकडे वळतात. (शहर प्रतिनिधी)
भेसळखोरांना रान मोकळे
By admin | Published: August 20, 2014 11:35 PM