देशातील १७ जिल्ह्यांत समावेश: उद्या दिल्लीत पंतप्रधानांच्या हस्ते सन्मान नरेश रहिले। लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : गोंदिया जिल्ह्यात वर्षातून एकदाच पीक घेतले जाते. त्यामुळे डिसेंबर ते जून या काळात गोंदिया जिल्ह्यातील मजुरांच्या हाताला काम राहात नाही. त्यामुळे येथील मजुरांचे इतर प्रातांत स्थलांतर होत होते. परंतु सन २०१५-१६ या वर्षात जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ही बाब ओळखून डिसेंबर ते जून या काळात प्रत्येक दिवशी ९० हजार मजूरांच्या हाताला काम मिळेल अशी व्यवस्था केल्यामुळे जिल्ह्यातील मजुरांचे स्थलांतरण थांबले होते. परिणामी महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेची सन २०१५-१६ या वर्षात उत्तमरीत्या अमंलबजावणी केल्यामुळे गोंदिया जिल्हा महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर आला. मग्रारोहयोत देशपातळीवर उत्कृष्ट कार्य करणाऱ्या जिल्ह्यांचा गौरव करण्यात येत असून या गौरवात १७ जिल्ह्यांची निवड करण्यात आली आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेत गोंदिया जिल्ह्याने केलेली कामगिरी महाराष्ट्रात पहिल्या क्रमांकावर होतीच तसेच देशात टॉप टेन मध्ये होती. तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांनी ६९ हजार मनुष्यबळ दिवसाची निर्मीती केली होती. रोहयोच्या कामावर येणाऱ्या मजूरांची आधार लिंकिंग करण्यात गोंदिया पहिल्या क्रमांकाव होता. या कामावर येणाऱ्या मजूरांना पंतप्रधान विमा योजनेचा लाभ देण्यात आघाडी घेतली होती. ६९ लाख मनुष्यबळ दिवस निर्माण केले. रोहयोच्या कामावर येणाऱ्या मजूरांमध्ये ४० टक्के मजूर मागासवर्गीय म्हणजेच अनुसूचित जाती, जमातीचे होते. एकूण मजूरांपैकी ६० टक्के महिला मजूरांना कामावर घेण्यात आले होते. १२६ कोटी रूपये खर्च करण्यात आले. त्यापैकी ७० टक्के रक्कम मजूरांच्या वेतनावर खर्च करण्यात आले. या कामातून गोंदिया जिल्ह्यात १८ हजार मालमत्ता निर्माण करण्यात आले. त्यात विहीर व शौचालयांचा समावेश आहे. या कार्यासाठी गोंदिया जिल्ह्याला सोमवारी १९ जून रोजी नवी दिल्लीच्या विज्ञान भवनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महात्मा गांधी नरेगा अवार्डने सन्मानित केले जाणार आहे. जिल्ह्यात सन २०१६-१७ या वर्षात ७८ लाख ७० हजार ९३६ मनुष्यबळ दिवस काम करण्याचे उद्दीट्ये ठेवण्यात आले आहे. परंतु ७३ लाख ५३ हजार ८४२ मनुष्यबळ दिवस काम उपलब्ध करण्यात आले. सन २०१७-१८ मध्ये १५ एप्रिल पर्यंत १९ हजार ५४३ मनुष्यदिवस काम उपलब्ध करण्यात आले. सन २०१६-१७ मध्ये १५७ कोटी २८ लाख ९७ हजार रूपये खर्च करण्यात आले. अकुशल मजूरीवर ११४ कोटी १६ हजार, कुशल मजूरीवर ३६ कोटी ३६ लाख ८ हजार तसेच ६ कोटी ९१ लाख ९८ हजार प्रशासकीय खर्चाचा समावेश आहे. यापूर्वी सन २०१५-१६ मध्ये ७१ लाख ४ हजार ९५३ मनुष्यबळ काम देण्याचे उद्दीट्ये होते. यातून ६९ लाख ५६ हजार ८२८ म्हणजेच ९७.९२ टक्के मनुष्यबळ काम देण्यात आले. देशात टॉप टेन मध्ये गोंदिया मग्रारोहयोच्या कामात उत्तम सादरीकरण करणाऱ्या राज्य, जिल्हा, विभाग व ग्राम पंचायतींना सन २०१५-१६ या वर्षासाठी केंद्रीय पंचायत राज विभागाद्वारे प्रस्ताव मागविण्यात आले होते. ग्रामीण विकास मंत्रालयाद्वारे महात्मा गांधी जिल्हा स्तरीय मनरेगा पुरस्कारासाठी देशातील १७ जिल्ह्यांची निवड करण्यात आली. यात गोंदिया जिल्हा देशात दहाव्या क्रमांकावर तर राज्यात प्रथम आहे. सदर पुरस्कार तत्कालीन जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, उपजिल्हाधिकारी (रोहयो) आर.टी.शिंदे, उपमुख्यकार्यकारी अधिकारी (रोहयो) नरेश भांडारकर, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र ठाकरे स्वीकारतील. नरेगाच्या कामामध्ये सुसूत्रता आणली जास्तीत जास्त वैयक्तिक लाभाची कामे मिळवून दिली. मजूरांना तत्काळ मजूरी मिळण्याची व्यवस्था व नरेगाच्या कामाची वैशिष्टपूर्ण अमलबजावणी केल्यामुळे हा पुरस्कार मिळाला आहे. -विजय सूर्यवंशी, माजी जिल्हाधिकारी, गोंदिया तथा सरंक्षण राज्यमंत्री यांचे खाजगी सचिव
रोहयोत गोंदिया राज्यात प्रथम
By admin | Published: June 18, 2017 12:17 AM