राजू दास यांचे अपघात प्रकरण : वडिलांकडून फेरतपासाची मागणीलोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : मृत राजू दास यांच्या अपघातप्रकरणी पवनी पोलिसांनी एकतर्फी तपास केला असून केवळ आरोपीच्या नजीकच्या लोकांचे बयान नोंदविले. यात आर्थिक उलाढाल झाली असून या प्रकरणी फेरतपास करण्याची मागणी वडील चित्तरंजन दास यांनी पत्रपरिषदेत केली आहे. बंगाली वसाहत अरूणनगर येथील राजू चित्तरंजन दास हा नागपूर येथील एका खासगी कंपनीत नोकरीला होता. तो २३ मे रोजी सकाळी नागपूरला दुचाकीने जात असताना बोरगाव-आसगावजवळ एका चारचाकी वाहनाने त्याला जबर धडक दिली. यात त्याचा मृत्यू झाला. या संदर्भात पवनी पोलिसांनी आरोपी अनिल मेश्राम (रा. चिमूर) याच्याविरूद्ध गुन्हा नोंदविला. मात्र बऱ्याच बाबी संशयास्पद असून त्या पोलिसांनी दडपल्याचा आरोप करण्यात आला आहे.अपघाताच्या वेळी मृतक राजू हा नागपूरच्या दिशेने दुचाकीने (एमएच ३५/एडी-२५७४) जात होता. तर आरोपी अनिल हा मारूती अल्टो (एमएच ३४/एए-५४३२) या वाहनाने लाखांदूरकडे येत होता. दोन्ही वाहनांची समोरासमोर धडक झाली. यात राजू दुचाकीवरून खाली पडला. त्यावेळी आरोपीने कार मागे घेतली व लोकांच्या मदतीने मृतकाला कारसमोर सरकावून ठेवले. मृतकाच्या कुटुंबीयांना या अपघाताची माहिती पोलिसांनी दिली नाही तर घटनास्थळावर हजर असलेल्या एका इसमाने भ्रमणध्वनीवरून मृतकाचा लहान भाऊ अमर याला दिली.अपघाताची माहिती मिळाल्यानंतर दास कुटुंबीय बोरगावकडे काही नातेवाईकांना घेवून निघाले. घटनास्थळावर पोहोचल्यानंतर कारचालकाच्या वाहनाचा समोरचा टायर पंचर झाल्याने हा अपघात घडल्याचे कळले. कुटुंबीयांनी पवनी पोलीस ठाणे गाठले व मृतक राजू तसेच कारचालक कुठे आहे, याविषयी पोलिसांना विचारणा केली. मृतक हा शवचिकित्सा गृहात तर आरोपी पोलिसांच्या ताब्यात असल्याचे पोलिसांनी सांगितले. आरोपीचे नाव व पत्ता ठाण्यात गेल्यानंतर कळले. अपघात २३ मे रोजी झाल्यापासून आरोपी पोलिसांच्या ताब्यात होता. मात्र २५ मे रोजी अटक दाखवून त्याच दिवसी त्याची जामीनावर सुटका झाली.पोलिसांनी आरोपीला दोन दिवसानंतर अटक करून जामीन मिळण्यासाठी संरक्षण दिले, असा आरोप आहे.आरोपीच्या पत्नीला तुम्ही कोठे जात होते, अशी पोलिसांनी विचारणा केली असता निमगाव (अर्जुनी-मोरगाव) येथे एका अंत्यसंस्कारासाठी जात असल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी हे कारण सांगू नका, दुसरे कोणतेही सांगा, असा सल्ला आरोपीच्या पत्नीला दिल्याचे कुटुंबीयांना प्रत्यक्षदर्शनी सांगितले.मृतकाची पत्नी प्रीती हिला पोलिसांनी बयानासाठी बोलावले. ३ जून रोजी त्यांनी आपले बयान नोंदविले.अपघात झाल्यानंतर आरोपीने मृतकाला उपचारासाठी १ किमी अंतरावर असलेल्या आसगावच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्याचे सौजन्य दाखविले नाही. कदाचित वेळेवर उपचार मिळाला असता तर राजूचे प्राण वाचू शकले असते, असे चित्तरंजन दास यांचे म्हणणे आहे. याविषयी त्यांनी ठाणेदार चौधरी यांची विचारणा केली असता आरोपीनेच अपघाताची माहिती पोलिसांना दिल्याचे त्यांनी सांगितले. मात्र अपघाताची माहिती बोरगावच्या पोलीस पाटलांनी पवनी पोलिसांना दिल्याची दस्तावेजात नोंद आहे. आरोपीने पोलिसांना माहिती दिल्याचा काय पुरावा आहे, अशी विचारणा केल्यावर तुम्ही माहितीच्या अधिकारात माहिती घ्या, असे ठाणेदारांनी सांगितल्याचा आरोप दास यांनी केला आहे. ही विसंगती आरोपीला संरक्षण देणारी असल्याचेही त्यांनी पत्रपरिषदेत सांगितले.या प्रकरणाविषयी ज्या-ज्या वेळी ठाणेदारांना विचारले तेव्हा आम्ही व्यस्त आहोत, आम्हाला हिच कामे आहेत का? चूक तुमच्या मुलाचीच आहे. कधी ठाण्यात असतानाही, सुट्टीवर आहे अशी उलटसुलट उत्तरे देतात, असा आरोप केला आहे. पोलिसांनी अपघाताचा केलेला पंचनामा अमान्य असून आमच्या समक्ष प्रत्यक्षदर्शी गावकऱ्यांचे बयान नोंदविण्यात यावे. तसेच सदर प्रकरणाची पूर्णत: व सखोल फेरचौकशी करण्याची मागणी चित्तरंजन दास यांनी पत्रपरिषदेत केली आहे.
प्रकरण दडपण्यात पोलिसांची भूमिका संशयास्पद
By admin | Published: July 03, 2017 1:31 AM