गोंदिया : समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी महिलांची भूमिका महत्त्वाची आहे. स्त्रियांनी प्रत्येक क्षेत्रात पुढे आले पाहिजे. महिला जोपर्यंत सशक्त होणार नाही तोपर्यंत समाजात कोणताही बदल होणार नाही. फक्त एक दिवस महामानवांची जयंती साजरी करुन वर्षभर बसण्याऐवजी वर्षभर समाजात मानवतावादी विचार रुजविण्यासाठी व त्या विचारांचे खऱ्या अर्थाने पालन करून समतामूलक समाज निर्मितीचा प्रयत्न करा. प्रत्येकाने समाजाच्या उन्नतीसाठी समाजाची शक्ती योग्यरित्या वापरणे आवश्यक झाले आहे. भावी पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षण संस्थान, प्रशिक्षण केंद्रे उभारणी, जनजागृती उपक्रम राबविणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन राष्ट्रीय प्रचारक व महिला सशक्तीकरण संघाचे संस्थापक आदरणीय भदंत डॉ. चंद्रकित्ती मंजुश्वर यांनी केले.
संत गुरु महामानव यांच्या मानवतावादी विचारांचे राष्ट्रीय प्रचारक व महिला सशक्तीकरण संघाचे संस्थापक आदरणीय भदंत डॉ. चंद्रकित्ती मंजुश्वर आणि त्यांचा महिला सशक्तीकरण संघ, नोएडा आणि नागपूर टीमचे गोंदियात नुकतेच आगमन झाले होते. स्थानिक मैत्रीय बुद्ध- बुद्ध विहार भीमनगर येथे एक चर्चा बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी ते बोलत होते. ज्येष्ठ साहित्यिक माणिक गेडाम, अवंतीबाई लोधी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवजी नागपुरे, संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, प्रा. डॉ. दिशा गेडाम, लक्ष्मी राऊत, उमा गजभिये, सविता उके यांना सद्भावना भेट दिली. भदंतजींनी अवंतीबाई लोधी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष शिवजी नागपुरे आणि अतुल सतदेवे यांना प्राणवायू प्रदान करणारे अमूल्य बोधी वृक्ष भेट देऊन त्यांचा सन्मान केला. अवंतीबाई लोधी महासभेच्या वतीने आदरणीय भदंत आणि त्यांच्या टीमचा सत्कार वीरांगना महाराणी अवंतीबाई यांचे तैलचित्र देऊन करण्यात आले.