गेटसाठी खोदकाम : आगारात चालक-वाहकांचा तुटवडा गोंदिया : येथील बस स्थानकात एकूण १२ फलाट आहेत. यापैकी सहा जुने तर सहा नवीन फलाट आहेत. मात्र प्रवाशांना कोणतीही सूचना न देता सध्या सहाच फलाटांवरून बसेस सोडण्यात येत असल्याने प्रवाशांची धावाधाव होत आहे. पूर्वी गोंदिया बसस्थानक केवळ सहा फलाटांचे होते. जिल्ह्यातील दोन आगारांपैकी गोंदिया आगार मोठे व महत्वाचे असल्याने येथून दूरपर्यंत अनेक बसफेऱ्या संचालित केल्या जातात. मात्र त्यावेळी फलाटांची संख्या कमी असल्याने बस स्थानकासमोरील खुल्या जागेत काही बसेस लावण्यात येत होत्या. ही समस्या ओळखून लाखो रूपयांच्या खर्चातून या बस स्थानकात आणखी नवीन सहा फलाटांचे बांधकाम करण्यात आले. लोकार्पणानंतर जुन्या व नवीन अशा एकूण १४ फलाटांवरून बसेस सोडण्यात येवू लागल्या. आता नवीन फलाटांवरून बसेस सोडणे बंद करण्यात आले आहे. सर्वच फलाटांवर कोणती बस कोणत्या मार्गाने कोठे जाईल, याची माहिली लिहिलेली आहे. ही माहिती वाचून नवीन प्रवासी मोठ्या संख्येने बंद फलाटांवर उभे राहून बस लागण्याची वाट बघतात. यानंतर या गावी जाणारी बस त्या फलाटावर उभी असल्याची घोषणा माईकद्वारे केली जाते. त्यामुळे बंद फलाटांकडील प्रवासी मोठ्या संख्येने दुसऱ्या दिशेकडील बस उभी असलेल्या फलाटाकडची वाट धरतात. यात प्रवाशांची एकच धावाधाव सुटले. यात ज्येष्ठ नागरिक व अल्पशिक्षित पुरूष-महिलांची समजत नसल्याने मोठीच डोकेदुखी होते. शिवाय गोंदियाच्या आगारात अनेक दिवसांपासून चालक व वाहकांची कमतरता आहे. त्यामुळे फेऱ्या रद्द होणे किंवा नियमित निर्धारित वेळेवर बस न सुटणे, ही समस्या कायम आहे. गोंदियाच्या आगारात चालक व वाहकांची पदभरती करणेही गरजेचे आहे. (प्रतिनिधी)
सहा फलाट बंद असल्याने प्रवाशांची धावाधाव
By admin | Published: January 05, 2017 12:58 AM