गडचिराेली : अहेरी तालुक्यातील वेलगूर टोला येथील विक्रेत्यांनी लावलेल्या हातभट्टीवर धाड टाकून २ लाख ६० हजार रुपये किमतीचा गुळाचा सडवा, दारू व साहित्य नष्ट केला. ही कारवाई अहेरी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने संयुक्तरीत्या केली.
वेलगूर टोला येथील दारूविक्रेते शेतशिवार व जंगल परिसराचा आधार घेऊन गुळाची दारू गाळतात. संघटनेच्या माध्यमातून विक्रेत्यांना वारंवार सूचना करूनही काही विक्रेत्यांनी आपला अवैध व्यवसाय सुरूच ठेवला. अशातच शुक्रवारी गाव परिसरात हातभट्टी लावून दारू गाळली जात असल्याची गुप्त माहिती मिळाली. माहितीच्या आधारे अहेरी पोलिस व मुक्तिपथ तालुका चमूने धाड टाकून हातभट्टी, १३ ड्रम गुळाचा सडवा व ४० लिटर दारू असा एकूण २ लाख ६० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून नष्ट केला.
याप्रकरणी तीन दारू विक्रेत्यावर गुन्हा दाखल करण्यात आला. ही कारवाई पोलिस उपनिरीक्षक रोहन जावळे, धर्मेंद्र मेश्राम, तोडासे, भारत सागर यांनी केली. यावेळी मुक्तिपथ तालुका संघटक राहुल महाकुलकार, मुक्तिपथ कार्यकर्ता आनंद कुमरी, भूषण गौरी उपस्थित होते.