गोरेगाव : प्रशासनाने टाळेबंदी काळात नवनवे नियम लागू केल्याने मोठ्या व्यापाऱ्यांसह लघू उद्योजकांना त्रास सहन करावा लागत आहे. यातच आता पुन्हा भर पडली असून, आरटीपीसीआर चाचणी करणे दुकानदारांना बंधनकारक करण्यात आले आहे, अन्यथा दुकानाला कुलूप ठोकण्याचा इशारा नगरपंचायतने दिला आहे.
टाळेबंदीच्या नियमानुसार व्यापाऱ्यांना ४ तास दुकान उघडावे लागते. त्यातच प्रशासनाचे नवनवे नियम पुढे येत असल्याने व्यापाऱ्यांकरिता एकापुढे एक समस्या निर्माण होत आहे. एकीकडे व्यापार करता येत नाही, तर दुसरीकडे प्रशासनाच्या नियमांचे उल्लंघन केल्यास रोजगार जाण्याची भीती या व्यावसायिकांना भेडसावत आहे. या नियमात फेरबदल करून सवलत देण्याची गरज आहे. सर्व व्यावसायिक ठरावीक दिवशी वेळेत आरटीपीसीआर चाचणी करू शकणार नाहीत. त्यातच ४ तास दुकान उघडावे लागत असल्याने, व्यापार व ग्राहकांना वस्तूंची विक्री व्यवस्थित करता येत नाही. त्यामुळे आर्थिक परिस्थिती बेताची झाली आहे. प्रशासनाने दुकानदारांना नोटीस बजावल्याने शारीरिक त्रासाबरोबर मानसिक ताण निर्माण झाल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे आहे. यात सवलत देण्यात आल्यास व्यापाऱ्यांना दिलासा मिळू शकेल, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. चाचणी न करणाऱ्या व्यावसायिकांचे दुकान बंद करण्याचा इशारा निरर्थक आहे, पण नियमानुसार पालन करण्याची तयारी व्यावसायिकांनी दाखविली आहे.
प्रशासनाने आवश्यक सेवेमध्ये दवाखाने व मेडिकल स्टोअर्स यांना सवलत दिली आहे, परंतु इतरांना सवलत देण्यात आली नसल्याची खंतही या व्यावसायिकांना आहे. प्रशासनाने प्रत्येक व्यावसायिकांना आरटीपीसीआर चाचणी करणे बंधनकारक केल्याने, नगरपंचायतने शनिवारी शहरात सर्वेक्षण करण्यास सुरुवात केली आहे. यात दुकानदार व दुकानात काम करणाऱ्या कामगारांचीही माहिती विचारली जाणार आहे. शहरातील दुकानदारांना माहितीसाठी शुक्रवारी (ता.२१) नगरपंचायतीने लाउडस्पीकरद्वारे या संदर्भात माहिती दिली. मात्र, प्रत्यक्षात लिखित स्वरूपात पत्र दिले नसल्याचे बोलले जात असून, चाचणीची वेळ निश्चित दिली गेली नाही. त्यामुळे नियमानुसार सकाळी दुकान उघडावे की नाही, हा प्रश्न त्यांच्यासमोर आहे.