कधी सुटणार समस्या? : येरंडीत अंगणवाडीला मिळाले बोअरवेलबाराभाटी : येरंडी येथील अंगणवाडी केंद्र २ मध्ये पाण्याची अडचण होती. ती आता दूर झाली आहे. नुकतीच बोअरवेल मिळाल्यामुळे कर्मचारी व शिकणारे बालके आनंदी झाले आहेत. मात्र ज्या मार्गाने बालके अंगणवाडीत येतात, तो मार्गावर केरकचऱ्याचे ढीग आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे.अर्जुनी-मोरगाव येथील पंचायत समिती बाल विकास कार्यालय अंतर्गत येणाऱ्या येरंडी येथील अंगणवाडी केंद्र २ मध्ये राज्याचे प्रधान सचिव श्याम तागडे यांनी माहिती दिली. सन २०१४-१५ आणि २०१५-१६ या वर्षात लोकमत वृत्तपत्राची त्यांनी दखल घेतली आणि २०१७ मार्चला या केंद्राला बोअरवेल मिळाले. सदर अंगणवाडी केंद्राला अनेक समस्यांनी घेरले आहे. आता फक्त पिण्याच्या पाण्याची सोय झाली. परंतु सुरक्षाभिंत नाही. या केंद्रात बालकांना ये-जा करण्यासाठी स्वच्छ रस्ता राहत नाही. रस्त्यावर नागरिक दररोज शौच करतात. गावात एका माणसाने दोनदोनदा शौचालय निधीची उचल केली, तरी असा प्रकार घडत आहे. त्यामुळे बालकांना खूप त्रास होतो. या रस्त्यावर कचऱ्याचे ढिग मोठ्या प्रमाणात आहेत. तसेच पावसाळा सुरू झाला की या रस्त्याच्या दोन्ही बाजूला हिरवागार कचरा उगवतो. त्यामुळे बालकांना सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असते. अंगणवाडीच्या आजूबाजूला खड्डे असल्याने पावसाळ्यात सांडपाणी जमा होतो. त्यामुळे बालकांच्या आरोग्यास धोका असतो. अशा अनेक समस्यांनी अंगणवाडी केंद्र-२ ग्रासले आहे. तरी बाल विकास अधिकाऱ्यांचे लक्ष नाही. उर्वरित समस्या सुटणार की नाही, हेच कळत नाही. जवळपास दोन वर्षांनी पहिली समस्या सुटली. त्यामुळे पाण्याची सोय झाली. यात ग्रामपंचायत प्रशाननाचे कोणतेच हातभार नाही. समस्या कधीच ग्रामपंचायत प्रशासनाने सोडवल्या नाहीत. त्यामुळे गावचा विकास खुंटला, असे नागरिकांचे मत आहे. गेल्या दोन वर्षाच्या काळात लोकमतच्या पुढाकाराने येरंडी गावातील जलकुंभाचे पाणी नागरिकांना मिळाले व अंगणवाडी-२ ला बोअरवेल मिळाले. मात्र स्थानिक प्रशासन निद्रावस्थेतच आहे. सदर अंगणवाडी-२ च्या सर्व समस्या सोडविण्यासाठी सेविका व कर्मचारी प्रयत्नशील आहेत. (वार्ताहर)
बालकांच्या रस्त्यावर केरकचऱ्याचे ढीग
By admin | Published: March 31, 2017 1:33 AM