लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : लस घेतलेल्या व्यक्तीपासून अन्य व्यक्तीला कोरोनाची लागण होण्याची शक्यता खूपच कमी असल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. अशात सर्वच नागरिकांनी कोरोनाची लस घेतल्यास कोरोनाचा संसर्ग होणार नाही व पुढेही कोरोनाला आपले पाय पसरता येणार नाही. यामुळेच शासनाकडून कोरोना लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र, त्यानंतरही कित्येक नागरिकांनी कोरोना लस घेतलेली नाही. तर, कित्येकांनी पहिला डोस घेऊन दुसरा डोस टोलवला आहे. अशात त्यांच्यापासून संपर्कात येणारी व्यक्ती बाधित होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यात आता ओमायक्रॉन या नव्या विषाणूने दहशत माजविली असल्याने शासनाने गर्दी ठिकाणांवर व शासकीय कार्यालयांत दोन्ही डोस घेतलेल्यांनाच प्रवेशाचा नियम केला आहे. या नियमाची मोठ्या शहरांत अंमलबजावणी होत आहे. मात्र, गोंदिया शहरात जिल्हा परिषद कार्यालय सोडून हा नियम नावापुरताच आहे. शहरात ना बाजारात ना शासकीय कार्यालयांत कोठेही लसीचे दोन्ही डोस घेतल्याबाबत विचारणा करणारा कुणीच नाही.
फक्त जिल्हा परिषद कार्यालयातच विचारणा - येथील जिल्हा परिषद कार्यालयातच या नियमाची अंमलबजावणी केली जात असल्याचे दिसते. कार्यालयातील प्रवेशद्वारातच हजर असलेला कर्मचारी येणाऱ्या नागरिकांना दोन्ही डोसबाबत विचारणा करतो. तसेच तोंडावर मास्क लावण्यास सांगत असून सॅनिटायजरही देतो. याशिवाय अन्य कोणत्याही कार्यालयात, बस्थानक, रेल्वेस्थानक, बाजार आदी ठिकाणी विचारणा करणार कुणीच दिसत नाही.
कारवाई करायची कोणी? - कोरोनाचा संसर्ग वाढलेला असताना जिल्हा प्रशासनाकडून तहसील कार्यालय, तसेच नगर परिषद कार्यालयातील कर्मचाऱ्यांचे पथक तयार करण्यात आले होते. या पथकांसोबतच शहर पोलीस, तसेच वाहतूक पोलीस सुद्धा मास्क न लावणाऱ्यांवर कारवाईत करीत होते. बाजारातील दुकानांमध्ये गर्दी होत असल्यास कारवाई केली जात होती. आता मात्र अशाप्रकारची कारवाई करणारा कुणीच नाही. ना पोलीस विभागा, ना अन्य पथक.