निलंबनाची मागणी: जिल्हाधिकाऱ्यांना दिले निवेदनलोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : सडक-अर्जुनी नगर पंचायत येथील मुख्याधिकारी हे नियमाप्रमाणे कामे करण्यास तयारच नाही. सदस्यांच्या घरी पत्र पाठवून खर्च्याला मंजूरी घेतात. साहित्य खरेदीसाठी पत्र पाठवून मंजूरी घेतात मात्र सभा आयोजित करीत नाही. जे पत्र सदस्याच्या पाठविल्या जाते त्यावर न.प.चा जावक क्रमांक राहत नाही. मुख्याधिकारीची स्वाक्षरी राहत नाही. पत्रावर तारीख राहत नाही. अशा मुख्याधिकारीवर जिल्हाधिकारी यांनी निलंबनाची कार्यवाही करावी अशी मागणी दिनेश अग्रवाल यांनी केली आहे. नगर पंचायत सडक-अर्जुनीने केलेल्या अनेक नियमबाह्य कामावर आक्रोश व्यक्त करीत नगर सेवकांनी २३ मे रोजी आयोजीत केलेल्या सर्वसाधारण सभेत गोंधळ घालून अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि मुख्याधिकारी यांना चांगलेच धारेवर धरले. जवळपास चार तास न.प.च्या नियमबाह्य कृत्यावरच चर्चा झाली. अध्यक्ष यांनी सर्वसाधारण सभा सुरू करण्याची विनंती ३.३० वाजता केली असता संपूर्ण सदस्यांनी सर्वसाधारण सभेवर बहिष्कार टाकून सभागृहातून बाहेर पडले. सभागृहात मुख्याधिकारीसह अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि काँग्रेसचे तीन सदस्य ज्योती गिऱ्हेपुंजे, अभय राऊत, रेहान शेख, राष्ट्रवादीचे देवचंद तरोणे, शशिकला टेंभूर्णे, मुनिश्वरबाई प्रियंक उजवणे, बाहुबली पॅनलचे बाबादास येरोला, महेश सूर्यवंशी, शिला प्रधान, अपक्ष कविता पात्रे, भाजपचे दिनेश अग्रवाल, तारा मडावी, जिजा पटोले, गिता शहारे, स्विकृत सदस्य मोहनकुमार शर्मा, दिलीप गभणे उपस्थित होते. सकाळी ११.३० वाजता आयोजित बैठक सुरु होण्यापूर्वीच न.प.च्या अनेक नियमबाह्य कृत्यावर चर्चा सुरु झाली. बाबादास येरोला बांधकाम सभापती असतांना बांधकामाविषयी त्यांना कोणतीही विचारणा करण्यात येत नाही. सर्वसाधारण सभेत बांधकाम समिती सभापतीने दिलेले विषय विषय सूचीवर घेण्यात येत नाही. पारीत झालेले ठराव जिल्हा कार्यालयाकडे पाठविण्याची जवाबदारी मुख्याधिकारीकडे असतांना ते आपले कर्तव्य पार पाडत नाही. असे अनेक मुद्दे सुरू असतांना उपाध्यक्ष सभा सोडूनच निघून गेले.त्यानंतर पाणी पुरवठा समितीचे सभापती ज्योती गिऱ्हेपुंजे यांनी अध्यक्ष व मुख्याधिकारी यांना धारेवर धरले. गावात तिव्र पाणी टंचाई पाहत सभापती यांनी मुख्याधिकारी यांना विनंती केली होती कि, पाणी टंचाईसाठी एक नवीन मोटार पंप आपण खरेदी करु, परंतु मुख्याधिकारी यांनी सभापतीला बजावले होते की माझ्याकडून परवानगी नाही. मग दोन नवीन मोटारी खरेदी केल्या व पाणी पुरवठ्यावर जवळपास १ लाख रुपये खर्च केले. पाणी टंचाई संदर्भात जर पाणी पुरवठा सभापती व समितीच्या सदस्यांनाच विश्वासात न घेता ही नगर पंचायत कार्य करीत असेल तर सभापती राहून माझा उपयोग काय? असा खडा सवाल सभापती ज्योती गिऱ्हेपुंजेने उपस्थित केला. कोणत्याही मुद्यावर अध्यक्ष व मुख्याधिकारी समाधानकारक उत्तरच देऊ शकत नव्हते. त्यामुळे उपस्थित देवचंद तरोणे, दिनेश अग्रवाल, महेश सूर्यवंशी, अभय राऊत, रेहान शेख, ज्योती गिऱ्हेपुंजे, कविता पात्रे, जिजाबाई पटोले, मुनिश्वर बाई, शशिकला टेंभुर्णे, ताराबाई प्रियंक उजवणे मडावी यांनी सभागृहाच्या त्याग करून बाहेर निघाले. निघण्याच्या पूर्वी मुख्याधिकारी व अध्यक्ष यांना सांगण्यात आले की, आजची सभा आपण रद्द करावी व आपण आपल्या सुविधेनुसार ही सभा पुढे बोलविण्यास सांगितले.
मुख्याधिकाऱ्यांची नियमाला तिलांजली
By admin | Published: May 29, 2017 1:44 AM