सौंदर्यीकरण रखडले : होम प्लॅटफार्मच्या आदेशाची प्रतीक्षादेवानंद शहारे गोंदियादक्षिण-पूर्व-मध्य रेल्वेच्या नागपूर ते बिलासपूर रेल्वे मार्गावरील गोंदिया एक महत्वपूर्ण स्थानक आहे. पण या स्थानकासोबतच जिल्ह्यातील इतरही स्थानकांच्या समस्या दूर करण्याकडे चालढकल केली जात आहे. प्रत्यक्ष कामे करण्यापेक्षा कामे करण्याच्या प्रस्तावांचीच चर्चा होत असल्यामुळे रेल्वे प्रवाशांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.महाराष्ट्रासह मध्य प्रदेश व छत्तीसगडच्या प्रवाशांना गोंदिया रेल्वे स्थानकातूनच इतरत्र ये-जा करावी लागते. दररोज ६० पेक्षा अधिक प्रवासी गाड्या या स्थानकातून धावतात. दररोज जवळपास २० हजार प्रवासी येथे उतरतात व एवढेच प्रवासी गाड्यांमध्ये चढतात. या स्थानकाचे विस्तारीकरण करण्यात आले. तीनऐवजी आता सात फलाटांवरून गाड्या धावतात. परंतु येथील तांत्रिक विकास व फलाटांचे सौंदर्यीकरण रखडले आहे. या बाबी केवळ प्रस्तावित असल्याचेच अधिकाऱ्यांकडून सांगितले जाते. प्लॅटफॉर्म-१ वर फूड स्टॉल व यूरिनल बनणार आहे. या होमप्लॅटफॉर्मवरून नागपूरच्या दिशेने जाणाऱ्या रेल्वेगाड्या सोडण्याची सोय करण्यात येणार आहे. तांत्रिक प्रक्रिया पूर्ण झाली असून वरील आदेशानुसार पुढील प्रक्रिया करण्यात येईल, असे संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले.गोंदियापर्यंत हवी तिसरी लाईनइतवारी, भंडारा रोड, गोंदिया, चांदाफोर्ट, देसाईगंज, तुमसर आदी स्थानकांना आतापर्यंत टर्मिनस बनू शकतील अशा सुविधा देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे या स्थानकांवरून नवीन गाड्या सोडता येऊ शकत नाहीत. मागील १० वर्षांत या झोनने विदर्भातील गोंदिया व इतवारी स्थानकांना त्यायोग्य बनविले नाही. त्यामुळे ही स्थानके दुर्ग व बिलासपूर स्थानकांच्या तुलनेत मागे पडली आहेत. तिसरी रेल्वे लाईन घालण्यात आली तेही प्रथम संपूर्ण छत्तीसगडच्या राजनांदगाव-दुर्गपासून बिलासपूर, रायगड व झारसुकडापर्यंतच आहे. केवळ गोंदिया ते इतवारीपर्यंतचे काम बाकी सोडण्यात आले. त्यामुळे या मार्गावरील रेल्वेप्रवाशांवर मोठा अन्याय झाला आहे. लोकप्रतिनिधीही त्यासाठी जोर लावताना दिसत नाही.तिरोडा स्थानकावरली व्यथा कोण ऐकणार?दक्षिण-मध्य-पूर्व रेल्वे मार्गावर तिरोडा हेसुद्धा एक महत्त्वपूर्ण स्थानक आहे. अदानी पॉवर प्रकल्पामुळे या स्थानकाचे महत्व आणखीच वाढले आहे. येथे इलेक्ट्रानिक अनाऊंस सिस्टम उपलब्ध झाली मात्र ती अद्याप सुरू करण्यात आली नाही. मनुष्यबळाची कमतरता हे कारण पुढे करून सदर सिस्टिमला धूळखात ठेवण्यात आले आहे. या स्थानकावर आणखी एका पुलाची गरज आहे. प्लॅटफॉर्म-१ वर असलेल्या पाणी टाकीजवळून प्लॅटफॉर्म-२ कडे तिरोडा शहराकडे जाणाऱ्या रस्त्याच्या दिशेने सदर पूल तयार करणे गरजेचे आहे. शहरातील प्रवासी शॉर्टकट म्हणून प्लॅटफॉर्म-२ कडून एकवर येतात. त्यामुळे अपघाताची शक्यता असते. पूल तयार झाले तर अपघाताची शक्यताच राहणार नाही. तिरोडा स्थानकावर विदर्भ एक्सप्रेस गाडीचा दोन मिनिटांसाठी थांबा देण्याची मागणी अनेक दिवसांपासून प्रलंबितच आहे. विदर्भ एक्सप्रेसचा थांबा मिळाल्यास एकीकडे प्रवाशांना सुविधा होईल तर दुसरीकडे रेल्वेच्या महसुलातही वाढ होवू शकेल.
कामे प्रस्तावित ठेवून होतेय चालढकल
By admin | Published: February 25, 2016 1:35 AM