विजय मानकर
सालेकसा (गोंदिया) : येथील ग्रामीण रुग्णालय तालुक्यातील गरीब जनतेला सेवा देण्यात सतत अपयशी ठरत आहे. या रुग्णालयाला मागील २५ वर्षांपासून कधीही नियमित एमबीबीएस डॉक्टर व वैद्यकीय अधिकारी मिळाला नाही. नेहमी डॉक्टरची तात्पुरती व्यवस्था करण्यात येते. सध्या या ग्रामीण रुग्णालयाची सेवा प्रतिनियुक्तीवरील डॉक्टरांच्या हाती देण्यात आली आहे. ३० नोव्हेंबरपर्यंत वेगवेगळ्या ठिकाणचे बीएएमएस डॉक्टर येऊन नऊ दिवस रात्री आणि दिवसा आठ-आठ तासांची सेवा देणार असल्याची माहिती आहे.
सालेकसा तालुक्याची लोकसंख्या १ लाखावर आहे. त्यापैकी ९० टक्के लोक गरीब व दारिद्र्यरेषेखाली जीवन जगणारे आहेत. त्यांना कोणताही आजार झाल्यास ते ग्रामीण रुग्णालयात धाव घेतात. परंतु येथे आल्यावर ग्रामीण लोकांना योग्य औषधोपचार मिळत नाहीत. नाईलाजाने गरीब जनतेला खासगी दवाखान्यात जाऊन पैसे खर्च करून औषधोपचार घ्यावा लागतो. परिणामी ग्रामीण रुग्णालय केवळ शोभेची वास्तू ठरत आहे. येथे नियमित आरोग्य सेवा मिळणे गरजेचे आहे. सोबतच सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया आणि अपघाताचे रुग्ण तसेच सर्पदंश विंचूदंश व अचानक आजारी पडलेल्या इतर रुग्णांना तातडीने औषधोपचार मिळणे आवश्यक असते. परंतु, या ग्रामीण रुग्णालयात नेहमीच रुग्णांची गैरसोय होत असल्याचे चित्र आहे.
चार दिवसांपूर्वी येथील एका व्यक्तीचा रेल्वे धडकेत मृत्यू झाल्यानंतर त्याला ग्रामीण रुग्णालयात उत्तरीय तपासणीसाठी पाठविले असता तिथे कोणतेही डॉक्टर उपलब्ध नसल्याने मृतदेह चार तास तसाच पडून होता. ग्रामीण रुग्णालयात एक वैद्यकीय अधीक्षक आणि तीन वैद्यकीय अधिकाऱ्यांची पदे मंजूर आहेत. त्यामध्ये एमबीबीएस तसेच तज्ज्ञ डॉक्टर असणे आवश्यक आहे. परंतु, या ग्रामीण रुग्णालयात सद्यस्थितीत एकही तज्ज्ञ डॉक्टर नाही.
डॉक्टरांची केली १२ दिवसांसाठी प्रतिनियुक्ती
बाह्य रुग्ण तपासणीसाठी कुठून तरी एक बीएएमएस डॉक्टर प्रतिनियुक्तीवर पाठवून दररोजची ओपीडी पूर्ण करावी लागत आहे. नियमित डॉक्टर नसल्यामुळे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी २२ ते ३० नोव्हेंबरपर्यंत नऊ दिवस १८ डॉक्टरांची १२ दिवसांसाठी प्रतिनियुक्ती केली आहे. एका डॉक्टराला सकाळी आठ ते रात्री आठपर्यंत बारा तास तर दुसऱ्या डॉक्टरला रात्री आठ ते सकाळी आठपर्यंत बारा तास सेवा देण्याचे निर्देश दिलेले आहेत. विशेष म्हणजे यापैकी कोणताही डॉक्टर एमबीबीएस नाही.
सालेकसाचे ग्रामीण रुग्णालय उपेक्षित
१९९४ मध्ये सालेकसा येथे ग्रामीण रुग्णालयाची स्थापना करण्यात आली. त्यावेळी राज्याचे आरोग्यमंत्री डॉ. हर्षवर्धन देशमुख यांच्या हस्ते मोठ्या थाटामाटात रुग्णालयाचा शुभारंभ करण्यात आला. यासाठी तत्कालीन खा. प्रफुल्ल पटेल व आ. भरत बहेकार यांनी मोलाची भूमिका निभावली होती. ग्रामीण रुग्णालय काही दिवस व्यवस्थित चालले. परंतु, त्यानंतर नियमित वैद्यकीय अधिकारी न मिळाल्याने हे रुग्णालय उपेक्षित राहिले.
रेफर टू सालेकसा ते रेफर टू गोंदिया
प्राथमिक आरोग्य केंद्रात एखादा रुग्ण बरा होत नसेल तर त्या रुग्णाला ग्रामीण रुग्णालयात रेफर केले जाते. मात्र, स्पेशालिस्ट डॉक्टर उपलब्ध नसल्यामुळे येथील तात्पुरती सेवा देणारे कोणताही उपचार न करता गोंदियाला पाठवितात. या तालुक्यात रेफर टू सालेकसा आणि रेफर टू गोंदिया असाच प्रकार सुरू आहे.
सालेकसा येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधीक्षकांसह चार एमबीबीएस डॉक्टरांचे पद मंजूर आहे. परंतु सर्व पदे रिक्त आहेत. संपूर्ण जिल्ह्यात एमबीबीएस डॉक्टरांची कमतरता आहे. रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून एमबीबीएस डॉक्टर देवरीवरून सालेकसा येथे प्रतिनियुक्तीवर पाठविले आहे.
- डॉ. बी.डी.जायस्वाल, प्रभारी वैद्यकीय अधीक्षक, ग्रामीण रुग्णालय सालेकसा.