२२ पैकी १२ पदे रिक्त : एकाच अधिकाऱ्यावर रुग्णालयाचा भारसालेकसा : आदिवासी, नक्षलग्रस्त क्षेत्रातील रुग्णांना उत्तमसेवा मिळावी १९९४ ला सालेकसा येथे ग्रामीण रुग्णालयाची निर्मिती करण्यात आली. परंतु या ग्रामीण रुग्णालयाला कर्मचाऱ्यांच्या रिक्तपदामुळे सलाईनवर राहण्याची पाळी आली आहे. समस्या या ग्रामीण रुग्णालय असल्याचे नागरिक व रुग्ण सांगत आहेत.ग्रामीण रुग्णालयात एकूण २२ पदे मंजूर आहेत. १० पदे भरलेली असून १२ पदे रिक्त आहेत. ५० टक्क्यापेक्षा जास्त येते कर्मचाऱ्यांची रिक्त पदे आहे. जिल्हा शल्य चिकित्सक आणि मताचा जोगवा मागून आदिवासी सेवक स्वत:ला समजणारे जनप्रतिनिधीनी या समस्येकडे लक्ष दिले नाही म्हणून आदिवासी समाजाला आरोग्याची उत्तमसेवा मिळू शकत नाही. वैद्यकीय अधीक्षकाचे पद १९९४ पासून ग्रामीण रुग्णालय निर्माण झाला तेव्हापासून रिक्त होते. आॅगस्ट २०१३ ला पी.एम. गवई यांची नियुक्ती वैद्यकीय अधीक्षक म्हणून करण्यात आली. गेल्या २० वर्षात पहिल्यांदा अधीक्षकाचे पद भरण्यात आले. कर्मचाऱ्यांच्या व नागरिकांच्या या अधीक्षकाबद्दलही तक्रारी आहेत. वैद्यकीय अधिकाऱ्याचे वर्ग २ चे ३ पदे मंजूर आहेत. ही पदे भरलेली आहेत. त्यातील डॉ. घागरे हे नागपूरला १ मे पासून प्रशिक्षणाला गेले असल्यामुळे हे पद रिक्त आहे. डॉ. सुषमा नितनवरे यांचेही पद भरलेले आहे. परंतु अनेकदा त्यांना सुट्टीवर जावे लागले. तिसरे पद डॉ. आर.पी. भोयरचे असून हे उच्च शिक्षण प्राप्त करण्यासाठी तीन वर्षासाठी मुंबईला गेले आहेत. त्यांचा पगार ग्रामीण रुग्णालय सालेकसा येथून निघत आहे. त्यामुळे ही जागा खाली आहे. तेव्हा प्रतिनियुक्तीवर काही वैद्यकीय अधिकाऱ्यांना अधामधात बोलाविण्यात येत असते. २७ जूनला एकच वैद्यकीय अधिकारी प्रतिनियुक्तीवर आलेले कार्य करीत होते. एका वैद्यकीय अधिकाऱ्याला २४ तास रुग्णांची सेवा करणे शक्य आहे काय? अधिक्षक पदावर असतांना डॉ. गवई यांना ओपीडी काढून तीन-चार दिवस २४ तास रुग्णालयाची सेवा करावी लागली होती. अशा प्रकारातून अनेकदा रुग्णाची हेळसांड होत असते. लिपीकाचे तीन पदे मंजूर आहेत. दोन पदे भरलेली आहेत. एक पद २०१२ रिक्त आहे ते अजूनही भरण्यात आले नाही. क्ष किरण तंत्रज्ञाचे पद २००९ पासून रिक्त आहे. येथील अचल चव्हाण यांची बदली झाल्यावर येथे पदे भरण्यात आले नाही. एक्स-रे मशिनही २०१० पासून बंद आहे. तिचा उपयोग रुग्णाला होत नाही परिणामी रुग्णाला खाजगी रुग्णालयात जाऊन एक्सरे काढावे लागते. सुकराम गिऱ्हेपुंजे हे मार्च २०१३ मध्ये सेवानिवृत्त झाल्यामुळे औषधी निर्माताचे पद रिक्त आहे. तेथे अधिपरिचारिका किंवा इतर कर्मचाऱ्यांना औषध वितरणासाठी ठेवण्यात येते. कक्षसेवकाची चार पदे मंजूर असून तीन पदे रिक्त आहेत. सफाई कामगाराची दोन पदे मंजूर असून एक पद भरलेले आहे व दोन पदे रिक्त आहेत. त्यामुळे रुग्णालयाच्या स्वच्छतेवर परिणाम होतो. अधिपरिचारिका यांची सात पदे मंजूर आहेत. त्यातील चार पदे भरलेली असून तीन पदे रिक्त आहेत. पण अधिपरिचारिकेची भंडारा येथे बदली झाली आहे. त्यांना लवकरच सोडण्यात येणार आहे. तेव्हा २२ पैकी १२ पदे रिक्त असून रुग्णालय सलाईनवर सुरू आहे. रुग्णालयाच्या परिसरातील पथदिवे अनेक महिन्यापासून बंद आहेत. परंतु दुरूस्तीकडे लक्ष देण्यात आले नाही. कर्मचारी क्वार्टर मध्ये राहात नाही. अनेकदा विंचू, साप यांचा सामना करावा लागतो. १० दिवसापासून बोअरवेल बिघडली आहे. तिला दुरूस्त करण्यात आले नाही. त्यामुळे रुग्णांना पाणी मिळत नाही. त्यांना स्वत:च पाण्याची व्यवस्था करावी लागते. शौचालयातही पाणी नाही. कर्मचारी वर्ग अपुरा असतानाही कार्यालयीन वेळेत उपस्थित राहत नाही. त्यामुळे रुग्णाला कागदपत्राच्यावरील शिक्यासाठी हेलपाटे खावे लागते. काही कर्मचारी बाहेर गावावरून अपडाऊन करून रुग्णाचा त्रास वाढविण्याचे काम करीत असल्याचे दिसत आहे. ग्रामपंचायत आमगाव खुर्दने अधिक्षकांची बदली करण्यात यावी असा १२ जून २०१४ ला ग्रामपंचायतचा ठराव घेतला आहे. सौरउर्जेचा प्रकल्प असूनही अनेक महिनेपासून तो बंद आहे. त्याकडे लक्ष देण्यात आले नाही. एवढ्या समस्या असतांना आदिवासी नक्षलग्रस्त क्षेत्रातील लोकांना उत्तम आरोग्य सेवा कशी मिळणार असा प्रश्न निर्माण होतो. आदिवासी सेवक समजणारे, विकासाच्या नावाखाली मते मागणारे लोकप्रतिनिधी हे धृतराष्ट्राची भूमिका बजावत आहेत. नागरिकांच्या समस्या सोडविण्याचा यशस्वी प्रयत्न करीत असल्याचे दिसून येते. रुग्णकल्याण समिती आहे. पण सदस्य उपलब्ध राहात नाही. (तालुका प्रतिनिधी)
ग्रामीण रुग्णालय सलाईनवर
By admin | Published: June 28, 2014 11:38 PM