लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती. नदी नाले भरुन वाहू लागले तर शेतांमध्ये पाणी साचल्याने धानाचे पऱ्हे व रोवणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. मात्र जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी कार्यालयातील अधिकारी पावसामुळे शेतीला कुठलाच फटका बसला नसल्याचा दावा करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे.जिल्ह्यात १५, १६ व १७ जुलैला मुसळधार पाऊस झाला. जिल्ह्यातील अनेक नदी नाल्यांना पूर आल्याने सर्वत्र पाणी साचले होते. यामुळे जवळपास हजारो हेक्टर शेती पाण्याखाली आली. तर काही शेतकऱ्यांनी चार पाच दिवसांपूर्वी केलेली रोवणी आणि धानाचे पऱ्हे वाहून गेले. त्यामुळे शेतकऱ्यांना खरीप हंगामाला मुकण्याची वेळ आली आहे. तर काही शेतकऱ्यांमध्ये अद्यापही पाणी साचले असल्याने चिंता वाढली आहे.दरम्यान शेतकरी संकटात असताना जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयातील अधिकारी जिल्ह्यात पावसामुळे पिकांचे कुठलेही नुकसान झाले नसल्याचा दावा कार्यालयात बसून करीत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळण्याची शक्यता मावळली आहे.जिल्ह्यात खरीप हंगामात १ लाख ७० हजार हेक्टरवर धान पिकांची लागवड केली जाते. सध्या रोवणीचा हंगाम सुरू आहे. जिल्ह्यातील ३० ते ४० टक्के शेतकऱ्यांची रोवणी आटोपली आहे. तर काही शेतकरी पावसाच्या प्रतीक्षेत होते.दरम्यान रविवारी (दि.१५) रात्रीपासून सुरू झालेल्या मुसळधार पावसाचा जोर मंगळवारी (दि.१७) तिसºया दिवशी सुध्दा कायम होता. त्यामुळे हजारो हेक्टर कृषी क्षेत्र पाण्याखाली आले.पिकांचा नुकसानीबाबत माहिती घेण्यासाठी जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अनिल इंगळे यांच्याशी संपर्क साधला असता कुठलेही नुकसान झाले नसून सर्वेक्षण करण्याची गरज नसल्याचे सांगितले.दोन विभागाच्या माहितीत तफावतजिल्ह्यात झालेल्या संततधार पावसामुळे घरांची पडझड झाली. तसेच पिकांचे सुध्दा मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आपत्ती व्यवस्थापन विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली. झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याची गरज असल्याचे सांगितले. मात्र दुसरीकडे जिल्हा कृषी विभागाचे कर्मचारी कार्यालयात बसून कुठलेच नुकसान झाले नसल्याचा दावा करीत असल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे. तर शासनाच्या दोन विभागांच्या माहितीत तफावत असल्याचे चित्र आहे.मदतकार्याला सुरूवातजिल्ह्यात रविवारी (दि.१५) रात्रीपासून सुरू झालेल्या संततधार पावसाचा जोर मंगळवारी (दि.१७) सलग तिसऱ्या दिवशी सुध्दा कायम होता. त्यामुळे जिल्ह्यात पूर परिस्थिती निर्माण झाली होती.अर्जुनी मोरगाव आणि आमगाव तालुक्यातील बनगाव येथील ४४ कुटुंबांना सुरक्षीत स्थळी हलविण्यात आले होते. बुधवारी (दि.१८) पाऊस कमी झाल्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे मदत कार्याला सुरूवात करण्यात आली.कोट्यवधींचे नुकसानजिल्ह्यात सतत तीन दिवस झालेल्या मुसळधार पावसामुळे ८०० हून अधिक घरांची पडझड झाली. तर अनेक शेतकऱ्यांच्या शेतातील रोवणी व धानाचे पऱ्हे वाहून गेले. त्यामुळे नागरिकांसह शेतकऱ्यांचे कोट्यवधी रुपयांचे नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज व्यक्त केला जात आहे.जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या नुकसानीचे सर्वेक्षण करण्याच्या कामाला महसूल विभागातर्फे सुरूवात करण्यात आली आहे. घरांची पडझड आणि पिकांचे झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याचे काम सुरू आहे.
धानाचे पऱ्हे व रोवणी गेली वाहून
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 18, 2018 11:01 PM
जिल्ह्यात मागील तीन दिवस झालेल्या संततधार पावसामुळे सर्वत्र पूर परिस्थिती निर्माण झाली होती. नदी नाले भरुन वाहू लागले तर शेतांमध्ये पाणी साचल्याने धानाचे पऱ्हे व रोवणी वाहून गेल्याने शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले.
ठळक मुद्देअतिवृष्टीचा फटका : कृषी विभागाचे अधिकारी म्हणतात नुकसान नाही