लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : शहराचा नावलौकिक वाढविणारा हा हुतात्मा स्मारक आहे. भारतीय स्वातंत्र्य संग्रामात आत्मार्पण केलेल्या हुतात्म्यांच्या आणि कारावास भोगलेल्या स्वातंत्र्य सैनिकांच्या स्मरणार्थ १९७३ मध्ये या स्मारकाची उभारणी झाली. एक विचार केला तर चहुबाजूंनी आवारभिंतीत बंदिस्त असलेले हे स्मारक आहे. दोन कोनशिलांपैकी एका कोनशीलेवर शहीद व कारावास भोगलेल्या ४५ हुतात्म्यांची नावे कोरली आहेत. तर दुसऱ्या कोनशिलेवर भारताचे संविधान कोरले आहे. हे स्मारक मोडकळीस आले आहे. ऑगस्ट क्रांती दिन, स्वातंत्र्य दिन व भारतीय गणराज्याच्या वर्धापन दिनी प्रशासनाला जाग येते. एरवी स्मारकाचे कधीच स्मरण होत असल्याचे आठवत नाही. या स्मारकाची देखभाल, दुरुस्ती व व्यवस्थापन नेमके कुणाकडे आहे हेच कळायला मार्ग नाही. आपल्या गावात देशासाठी बलिदान देणाऱ्याच्या स्मरणार्थ स्मारक आहे, याची साधी कल्पनाही नाही. याला एकमेव कारण हे स्थळ प्रकाश झोतात नाही हेच असू शकते.स्मारकाचे स्मरण निवृत्त सैनिकांच्या संघटनेमुळे अलिकडे होऊ लागले आहे. नुकताच त्यांनी या स्थळी कारगिल विजय दिवस साजरा केला होता. त्यात प्रशासकीय अधिकारी सुद्धा आमंत्रित होते. त्यावेळी स्मारकाच्या सुशोभीकरणाची आठवण करून देण्यात आली. काही वर्षांपूर्वी स्थानिक पंचायत समितीने जिल्हा निधीतून सुमारे साडे चार लक्ष रु पयांचा सुशोभीकरणाचा प्रस्ताव तयार केला होता. मात्र तो हवेतच विरला. आजच्या युवापिढीत देशाभिमान जागृत होण्याच्या दृष्टीने या स्मारकाचे प्रेक्षणीय स्थळात रूपांतर होणे काळाची गरज आहे. त्यामुळे प्रशासनाने याकडे लक्ष देण्याची गरज आहे.मी शहीद स्मारकभारतमातेला इंग्रजांच्या गुलामगिरीच्या जोखडातून मुक्त करण्यासाठी ज्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली त्यांचे स्मरण करण्याचा दिवस म्हणजे, ९ ऑगस्ट क्रांती दिन... स्वातंत्र्यासाठी १९४२ चा अखेरचा लढा. महात्मा गांधींनी ‘चले जाव’चा नारा दिला. ‘करेंगे या मरेंगे’च्या गगनभेदी घोषणेने अख्खा देश पेटून उठला. या आंदोलनात लाखो तरुणांनी सहभाग नोंदविला अन् बघता बघता सारा देशच जणू तुरुंग झाला. परंतु ९ ऑगस्टला देशात विविध ठिकाणी जनक्षोभ भडकला. या आंदोलनात अनेक वीरांनी प्राणाची पर्वा न करता ब्रिटिश सरकारविरोधात बंड पुकारले. अनेकांना वीरगती प्राप्त झाली. त्यांच्याच स्मरणार्थ प्रत्येक जिल्ह्यात शहीद स्मारके उभारण्यात आली. आज क्रांती दिनानिमित्त या स्मारकांच्या अवस्थेवर प्रकाश टाकणारे हे वृत्त...
व्यर्थ न हो बलिदान...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 08, 2020 9:47 PM