गोंदिया : रेल्वेगाडीच्या डब्यात मिळालेली सोन्याची साखळी रेल्वे पोलिसांनी खऱ्या मालकाचा शोध घेऊन त्यांना परत केली. सुमारे ६० हजार रुपये किमतीची ही सोन्याची साखळी होती.
रेल्वे पोलीस ठाण्याचे प्रभारी निरीक्षक नंदबहादूर यांच्या मार्गदर्शनात प्रधान आरक्षक एन.ई. नगराळे, आरक्षक नासीर खान, एस.के. नेवारे, पी. दलाई हे रेल्वे स्थानकावर निगराणी ठेवून असताना फलाट क्रमांक-५ वर सुमारे ११.३० वाजेच्या सुमारास आलेल्या गाडीतून यात्री उतरले. यातील एका यात्रीने त्यांच्या सीट क्रमांक ३४-३५ जवळ एक पिवळ्या धातूची साखळी पडून असल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी जाऊन बघितले व साखळी ताब्यात घेतली. पोलिसांनी स्थानकावर उपस्थित प्रवाशांना साखळीबाबत विचारणा केली असता कुणीही त्यांची नसल्याचे सांगितले. यावर पोलिसांनी विशेषज्ञांकडून तपासणी करविली असता ती साखळी सुमारे ११ ग्राम सोन्याची असून ६० हजार रुपये किमतीची होती. यावर पोलिसांनी चोरी किंवा हरविल्याच्या तक्रारींबाबत माहिती घेतली. मात्र, काहीच हाती न लागल्याने त्या डब्यात प्रवास करीत असलेल्या प्रवाशांची यादी मागवून त्यातून विचारपूस सुरू केली. यात ती साखळी आमगाव निवासी नरेंद्र ठाकरे यांची असल्याचे कळले. पोलिसांनी त्यांना ठाण्यात बोलावून सर्व कागदपत्रांची पाहणी करून साखळी त्यांना दिली.