वनविभागाचा उपक्रम : बांबू पुरवून दिली चालनालालसिंग चंदेल पांढरीसडक अर्जुनी तालुक्यातील ग्राम कोहमारा येथील बिरसा मुंडा बांबू बुरड कामगार संस्था र.नं. १३४२/१५ या संस्थेच्या लोकांना वनविभाग कार्यालय सडक अर्जुनी व कोहमाराच्या माध्यमातून रोजगार मिळाल्याने बुरड कामगारांना आता सुगीचे दिवस आल्याचे दिसून येत आहे. कामाअभावी उपासमारीच्या उंबरठ्यावर असलेल्या या कामगारांना आता दिलासा मिळाला आहे.वैज्ञानिक युगामध्ये विविध प्रकारे यंत्रणेच्या माध्यमातून कलात्मक वस्तु निर्माण होत असल्यामुळे बुरड कामगारांवर उपासमारीची पाळी आली होती. परंतु उपवनसंरक्षक रामगावकर यांच्या सहकार्याने बुरड कामगारांना बाबू व लागणारी यंत्रणा उपलब्ध करुन व बुरड कामगारांना १० ते १५ दिवसांचे प्रशिक्षण देऊन त्यांच्या कामाला चालना मिळाली, असे बिरसा मुंडा संस्थेचे कामगार श्यामकुमार पेंदाम यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले.या बुरड कामगारांन तयार केलेला माल नागपूरसारख्या मोठ्या शहरामध्ये विक्रीला नेला जात आहे. त्यामुळे या वनपरिक्षेत्र कार्यालय कोहमारा येथे १० ते १५ मजूर काम करताना दिसत आहेत. त्यांना २०० ते २५० रुपये प्रतिदिवस रोजी पडत असल्याचे कामगारांचे म्हणणे आहे. त्यामुळे बुरड कामगारांना वनविभागामार्फत एक प्रकारचे हक्काचा व्यवसाय मिळाल्याचे दिसून येते. बुरड कामगारांचा पाच गावांचा ग्रुप तयार व्हावा, जेणेकरून जे कामगार आहेत त्यांना रोजगार मिळेल अशी इच्छा कामगारांनी व्यक्त केली. बुरड कामगारांना आता सुगीचे दिवस येण्याची आशा वाटत आहे.बुरड कामगारांना १० ते १५ दिवसांचे प्रशिक्षण देवून व वनविभागातून तोडलेला बाबु मोफत देवून त्यांच्याकडून काम करुन घेतले जात आहे. बुरड कामगारांनी तयार केलेल्या घरगुती उपयोगाच्या विविध वस्तूंमधून त्यांची अप्रतिम कला प्रकट होत आहे. - सुनील खांडेकर, राऊंड आॅफिसर, वनपरिक्षेत्र कार्यालय, कोहमारा
बुरड कामगारांना आले सुगीचे दिवस
By admin | Published: January 06, 2016 2:10 AM