राजकुमार भगत ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक-अर्जुनी : शासकीय दप्तर दिंरगाई कधी कुणाच्या जीवावर बेतेल हे सांगता येत नाही. प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या छोट्याशा चुकीमुळे कुणाला त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागते. अथवा त्यासाठी न्यायालयीन लढा द्यावा लागतो. मात्र चक्क जिवंत असलेल्या व्यक्तीला ग्रामपंचायतने मृत दाखवून त्याचे मृत्यू प्रमाणपत्र सुध्दा त्याच्या घरी पाठविल्याने. या प्रकारामुळे संप्तत झालेल्या त्या व्यक्तीच्या कुटुंबीयांना प्रशासनाला अखेर ‘साहेब मनोहर अभी जिंदा है’ असे ठासून सांगण्याची वेळ आली. हा कुठल्या चित्रपटातील प्रकार नसून सकड-अर्जुनी तालुक्यातील एका ग्रामपंचायतच्या कारभाराचा नमुना आहे.प्राप्त माहितीनुसार ग्रामपंचायत बौध्दनगर अंतर्गत मोकासीटोला हे गाव आहे. या गावातील रहिवासी मनोहर मार्कंड राऊत (५३) मागील अनेक वर्षांपासून मोकासीटोला येथेच राहतात. मात्र येथील ग्रामपंचायतने राऊत यांच्या घरी त्यांच्या मृत्यूचे प्रमाणपत्र पाठविले. हे प्रमाणपत्र पाहुन राऊत यांच्या कुटुंबीयांना सुध्दा चांगलाच आश्चर्याचा धक्का बसला. त्या जिवंत व्यक्तीला पाहून नातेवाईकांमध्ये सुध्दा काही वेळ गोंधळ उडाला होता. मात्र हा सर्व सावळा गोंधळ ग्रामसेवकाच्या चुकीमुळे घडल्याची बाब पुढे आली.ग्रामसेविका आणि सरपंच यांनी मनोहर राऊत यांच्या मृत्यूची नोंद करुन त्याचे प्रमाणपत्र आपल्या स्वाक्षरीसह प्रसिध्द केले. हे मृत्यूचे प्रमाणपत्र पाहून राऊत यांनी ग्रा.पं.ला पुन्हा रहिवासी दाखला मागितला. आपण जिवंत असताना आपल्याला मृत दाखविल्यामुळे आपली मालमत्ता तर हडपण्याचा कुणाचा हेतू तर नाही अशी शंका राऊत यांना आली.मृत्यू प्रमाणपत्रावर त्यांच्या मृत्यूची नोंद ८ मे २००६ असून नोंदणी क्रंमाक. ५ असे लिहिले. त्यांचा मृत्यू ३० एप्रिल २००६ रोजी झाल्याचे दाखविण्यात आले आहे. ग्रा.पं. संगणकाद्वारे मृत्यू पश्चात वारसान प्रमाणपत्र २३ नोव्हेंबर २०१७ रोजी ग्रा.पं.ने प्रसिध्द केले आहे.यासर्व प्रकारामुळे राऊत यांच्या कुटुंबीयांना चांगलाच मानसिक धक्का बसला. म्हणून त्यांनी ग्रामसेवक एस.डी.मुंडे यांना त्वरीत सेवेतून बडतर्फ करावे आणि सरपंच सुरेखा झिंगरे यांना पदमुक्त करण्याची मागणी केली आहे. राऊत यांनी संबंधिची तक्रार जिल्हा परिषद उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत विभाग, ग्राम विकास मंत्रालय, तहसीलदार सडक-अर्जुनी, खंडविकास अधिकारी सडक-अर्जुनी, ठाणेदार डुग्गीपार यांच्याकडे केली आहे.ग्रामसेविकेविरुध तक्रारग्रामसेविका एस.डी.मुंडे यांनी या अगोदर स्वच्छ भारत मिशन योजनेअंतर्गत वैयक्तिक शौचालय बांधकाम योजनेचे दशरथ बुधा बनकर रा.फुले नगर यांचे १२ हजार रुपये स्वत:च उचल केल्याचा आरोप होता. त्याची तक्रारही मुख्य कार्यकारी अधिकारी गोंदिया यांच्याकडे केली आहे
साहेब, मनोहर अभी जिंदा है...
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2018 12:14 AM
शासकीय दप्तर दिंरगाई कधी कुणाच्या जीवावर बेतेल हे सांगता येत नाही. प्रशासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या छोट्याशा चुकीमुळे कुणाला त्यांच्या हक्कापासून वंचित राहावे लागते. अथवा त्यासाठी न्यायालयीन लढा द्यावा लागतो.
ठळक मुद्दे ग्रा.पं.ने दाखविले जिवंत व्यक्तीला मृत : कुटुंबीयांची कारवाईची मागणी