काचेवानी : सालेबर्डी येथे तीर्थक्षेत्र महाबोधी संत विश्रामबाबा समाधी स्थळी गुढीपाडवा दिनी यात्रा भरली. या महोत्सवात तब्बल १० हजार भाविकांनी हजेरी लावली. महोत्सवात तिरोडा क्षेत्राचे माजी आ. दिलीप बंसोड, जि.प. सदस्य मनोज डोंगरे, विनोद लिल्हारे, समिती अध्यक्ष गोरखनाथ येडेकर, श्याम डोंगरवार, बबलदास रामटेके, खोब्रागडे, नेतराम माने प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविकातून गोरखनाथ येडेकर यांनी विकास कामांची मागणी ठेवली. जि.प. सदस्य मनोज डोंगरे यांनी महाबोधी संत विश्रामबाबा यांच्या जीवनचरित्र, त्यांची थोरवीविषयी मार्गदर्शन केले. माजी आ. दिलीप बंसोड यांनी तीर्थक्षेत्र महाबोधी संत विश्रामबाबा यांच्या महत्तेबद्दल माहिती सांगितली. विकास कामाबद्दल प्रस्तावित केलेल्या कामासंबंधात भाविकांसाठी सभामंडप, अदानी फाऊंडेशनकडून खुर्च्या, रस्त्याचे काम आदी समस्या पूर्ण करण्याची मी जबाबदारी स्वीकारली असून मी संबंधितांशी बोलणी करणार, असेही बन्सोड म्हणाले. दुपारी ४ वाजता ध्वजारोहण, पूजा प्रार्थना व अभिषेक, भक्ताचे पूजन व अभिवादन, रात्री ८ वाजता महाप्रसाद आणि रात्री १० वाजता भक्तीगीतांचा प्रबोधन व कव्वाली कार्यक्रम घेण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने भाविकांची उपस्थिती होती. (वार्ताहर)
सालेबर्डीच्या महोत्सवात १० हजार भाविकांची हजेरी
By admin | Published: April 01, 2017 2:40 AM