जलयुक्त शिवार योजना : सात तलावांचे खोलीकरण अमरचंद ठवरे । लोकमत न्यूज नेटवर्कबोंडगावदेवी : जलयुक्त शिवार योजना २०१६-१७ मध्ये विविध कामे करण्यासाठी बोंडगावदेवी गावाची निवड करण्यात आली आहे. तालुका स्तरावरील तालुका कृषी अधिकारी, लघु पाटबंधारे उपविभाग तसेच स्थानिक ग्रामपंचायतच्या वतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेंतर्गत गावाजवळील बोड्यांचे खोलीकरण व मातीकाम करण्यात येत आहे. मात्र या खोलीकरणाच्या कामातील मुरूम व मातीची चढ्या भावाने सर्रास विक्री केली जात आहे.जलयुक्त शिवार अभियान अंतर्गत लघु पाटबंधारे उपविभाग अर्जुनी-मोरगाव अंतर्गत गावातील ७ बोंडगावचे ई-टेंडर काढून खोलीकरण करण्याच्या कामाला मोठ्या प्रमाणात गती देण्यात आली. तलावाचे खोलीकरण करताना तलावामधून निघणाऱ्या मुरुमाची व मातीची चढ्या भावानी सर्रास विक्री केली जात असल्याचा प्रकार बिनबोभाटपणे गावात सुरु आहे. तालुक्याच्या ठिकाणी असलेल्या लघु पाटबंधारे उपविभाग कार्यालयाच्या वतीने गावातील गट क्रमांक १६१, १३६, ३७२, ५१५, ५६९, ५२७ अशा ७ बोड्यांचे खोलीकरण जलयुत शिवार अभियान अंतर्गत ई-टेंडर पध्दतीने कंत्राटदारामार्फत करण्यात येत असल्याचे कार्यालयातील विश्वसनीय सूत्रांकडून सांगण्यात आले. सदर बोड्यांमध्ये भोई समाज बांधवांना मत्स्यव्यवसाय करण्यासाठी उपयोगी पडण्याच्या हेतूने १ मीटर खोलीच्या आकाराचे खोलीकरण करण्यात येत असल्याचे एका तंत्र अधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले. सदर खोलीकरण करताना निघालेली माती व मुरुम तलावापासून एक किमी अंतराजवळील सार्वजनिक ठिकाणी टाकता येईल, असे काम करताना निकष असल्याचे बोलल्या जाते. गावाशेजारील बोड्याचे खोलीकरण जेसीपीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात करण्यात येत आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार बोड्यांमधून निघालेला मुरुम व माती सार्वजनिक ठिकाणी न घालता खासगी घरांमध्ये वेगवेगळ्या दराने मोठ्या प्रमाणात घातल्याचे खुलेआम बोलल्या जात आहे. एका बोडीच्या खोलीकरणाची हजारो ट्रॅक्टर माती, मुरुम एकाच खासगी ईसमाच्या बांधकामावर टाकण्यात आल्याचे ऐकण्यात येत आहे. खोलीकरणाच्या उत्खननातून निघालेल्या माती, मुरुमाचे प्रती ट्रॅक्टर भाव ३०० रूपये, २५० रूपये, २०० रूपये, १६० रुपये याप्रमाणे माणूस पाहून घालण्यात आल्याची चर्चा गावभर आहे. काही माती मुरुम कंत्राटदारामार्फत काम करण्यात येत असलेल्या रस्त्याच्या मजबूती व रुंदीकरणाच्या कामावर टाकून संबंधित कंत्राटदाराने माल सुतो अभियान बिनबोभाटपणे सुरु केल्याचे सांगितल्या जात आहे. लघुपाटबंधारे विभागाने लक्ष द्यावे गावाजवळील सात बोड्यांचे खोलीकरण करण्याच्या कामाचे कंत्राट होऊनसुध्दा चढ्या भावाने बोड्यांमधील माती मुरुम मोठ्या प्रमाणात विकला गेला. खोलीकरण करण्याच्या नावावर एका रस्ता कंत्राटदाराने खोलीकरण करण्यात येणाऱ्या बोडीमधील माती व मुरुम स्वत: खोदून नेऊन रस्ता निर्मितीच्या कामात लावल्याचे समजते. एकंदरीत गावाजवळील सात बोड्यांच्या खोलीकरण कामात संबंधिताचे चांगलेच फावल्याचे बोलल्या जात आहे. खोलीकरण एका ढाच्यात होणे आवश्यक आहे. गावाजवळच्या बोड्या असल्याने मानवासह, जनावरांचा नेहमी वावर असतो. एका ठिकाणी खड्डे निर्माण झाल्यास भविष्यात मोठी दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. याकडे लघु पाटबंधारे विभागाने लक्ष देणे गरजेचे आहे. कामाचे ई टेंडर गावातील ७ बोड्यांचे खोलीकरण करण्यासाठी १० लाख ४२ हजार ३०० रुपयांमध्ये ई-टेंडरमार्फत कंत्राट झाल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. जलयुक्त शिवार अभियानांतर्गत खोलीकरण करत असतानासुध्दा उत्खननाच्या माध्यमातून निघालेला मुरुम व माती चढ्या भावाने विकून कंत्राटदारांनी गावकऱ्यांकडून लाखोच्यावर रूपये वसूल केल्याचे गावात बोलल्या जात आहे. सदर कामाचे टेंडर होऊनसुध्दा गावात माती पैशाच्या मोबदल्यात कशी विकली गेली, हेच कळायला मार्ग नाही. बोड्यांचे अनेकदा खोलीकरण गावातील विकास कामे शासनाच्या विविध यंत्रणेकडून केल्या जातात. ग्रामपंचायतच्या वतीने महात्मा गांधी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गावाजवळील बोड्यांची दुरूस्ती करण्याच्या हेतूने बोडीमध्ये खोदकाम करुन पाळीवर माती टाकण्यात आली. दरवर्षी या बोळ्यांमध्ये खोदकाम केले जात असल्याचे समजते. यावर्षी गावाजवळील एका बोडीचे खोलीकरण करण्यासाठी एमआरईजीएस अंतर्गत जवळपास १६ लाख रुपये मंजूर झाले असून मागिल महिन्यात गावातील मंजुरांच्या हस्ते त्या बोडीचे खोलीकरण करण्यात आले. जवळपास १२ लाख रुपये खर्च करण्यात आल्याचे एका जबाबदार व्यक्तीकडून सांगण्यात आले. त्याचप्रमाणे रस्ता मजबुतीकरण करणाऱ्या काही खासगी कंत्राटदारांनी गावाजवळील बोडींमधील मुरूम काढण्याची परवानगी होऊन खोलीकरणासह मुरुम काढले. अशा बोड्याचे खोलीकरण करण्याचे काम पुन्हा झाल्याने कंत्राटदाराला चांगलेच फावल्याचे बोलल्या जाते.
मुरूम व मातीची चढ्या भावाने विक्री
By admin | Published: June 19, 2017 1:26 AM