लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : रब्बी हंगामातील धान खरेदीची दिलेली मर्यादा पूर्ण झाल्याने जिल्हा मार्केटिंग फेडरेशनची जिल्ह्यातील सर्व धान खरेदी केंद्र पाच दिवसांपूर्वीच बंद झाली. मात्र, मर्यादा वाढवून मिळेल भोळ्या आशेवर शेतकरी असून, ते केंद्राबाहेर धान घेऊन आहेत. शेतकऱ्यांच्या झालेल्या कोंडीचा फायदा खासगी व्यापारी घेत असून, १,९४० रुपये क्विंटलचे धान १,२०० रुपये क्विंटलने खरेदी करीत असल्याचे चित्र आहे.केंद्र सरकारने रब्बी हंगामात धान खरेदीसाठी यंदा राज्याला प्रथमच धान खरेदीची मर्यादा ठरवून दिली. त्यातच जिल्ह्यात रब्बी ३५ लाख क्विंटल धानाचे उत्पादन झाले आणि खरेदीची मर्यादा केवळ ९ लाख १२ हजार क्विंटलची दिली, तर ७७ हजार शेतकऱ्यांनी धानाची विक्री करण्यासाठी शासनाच्या ऑनलाईन संकेत स्थळावर नोंदणी केली आहे. यापैकी आतापर्यंत केवळ १३ ते १४ शेतकऱ्यांचे धान खरेदी करण्यात आले आहे. जवळपास ५० हजार शेतकऱ्यांचे २६ लाख क्विंटल धान शेतकऱ्यांच्या घरात पडले आहे. धान खरेदीची मर्यादा वाढवून देण्यासाठी सध्या पाठपुरावा केला जात असल्याने शेतकऱ्यांना खरेदीची मर्यादा वाढवून दिली जाईल, ही आशा आहे. त्यामुळे अनेक शेतकऱ्यांनी ट्रॅक्टरमध्ये धान भरुन खरेदी केंद्राबाहेर रांगा लावून ठेवल्याचे चित्र आहे. दुसरीकडे जिल्ह्यात पाऊस झाल्याने पेरणीच्या कामाला जोमाने सुरुवात झाली आहे. त्यामुळे शेतकरी शेतीच्या कामात व्यस्त आहेत. खरिपासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज असल्याने ते कमी दराने धानाची विक्री करुन पैशांची जुळवाजुळव करीत आहेत. शेतकऱ्यांच्या अडचणीचा खासगी व्यापारी पुरेपूर फायदा घेत असून, अत्यंत कमी दराने धानाची खरेदी करीत आहेत. यामुळे शेतकऱ्यांना क्विंटलमागे ७०० ते ८०० रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे.
रास्ता रोको आंदोलन तूर्तास स्थगित - बंद झालेली धान खरेदी पुन्हा सुरू करण्याकरिता तसेच नियमित प्रत्येक हंगामात धान खरेदीकरिता शेतकऱ्यांचे राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ६ कोहमारा टी-पाॅईंटरवर बुधवारी (दि. २२) भव्य रास्ता रोको आंदोलन करण्यात येणार होते. पण, काही तांत्रिक अडचणीमुळे हे आंदोलन तूर्तास स्थगित करण्यात आले आहे.
काही केंद्रांवर खरेदी सुरु
- जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने सर्वच धान खरेदी केंद्रांना खरेदी बंद करण्याचे निर्देश दिले आहेत. मात्र, यानंतरही जिल्ह्यातील काही केंद्रांवर धान खरेदी सुरु असल्याची माहिती आहे. मर्यादा वाढवून मिळाली तर हमीभावाने नाही तर १,४०० रुपये प्रतिक्विंटलने दराने धान खरेदी करू, असे शेतकऱ्यांना सांगितले जात आहे. मात्र, या सर्व प्रकाराकडे जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि संबंधित विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र आहे. आता जनहित याचिका दाखल करणार - रब्बी हंगामातील २६ लाख क्विंटल धान अजूनही शेतकऱ्यांकडे पडले आहे. ५० हजारांवर शेतकरी धान खरेदीच्या प्रतीक्षेत आहेत, तर केंद्र सरकारने यावर अद्याप तोडगा काढलेला नाही. त्यामुळे हा धान खराब होण्याची शक्यता असून, याचा फटका शेतकऱ्यांना बसण्याची शक्यता आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष गंगाधर परशुरामकर, डॉ. अविनाश काशिवार हे गुरुवारी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठात याप्रकरणी याचिका दाखल करणार आहेत.