आमगाव : तालुक्यात अनेक ठिकाणी ले-आऊट असून या ले-आऊट मध्ये येथील नागरिकांसाठी विकास कामासाठी राखीव भूखंड ठेवणे आवश्यक असते. परंतु या राखीव भूखंडावर भूमाफियां प्लॉट तयार करून परस्पर विक्री करीत असल्याचे प्रकार उघडकीस आले आहे. तलाठ्यासोबत संगनमत करून बनावट सातबारावर प्लॉट विक्रीचा हा सर्व गौडबंगाल सुरू असल्याचे दिसत आहे.
शहरात भूखंड माफियांचा सुळसुळाट असून शहराला लागून रिसामा, आमगाव व बनगाव येथे जमिनी खरेदी करून त्या जमिनी अकृषक करून ले-आउट काढून प्लाॅट विक्री करण्यात आली आहे. हे ले-आऊट टाकून मोठय़ा प्रमाणात खरेदी-विक्री व्यवहार सुरू करण्यात आले. विकास आराखडा व सरकारी नियमानुसार ले-आऊट मध्ये क्रीडांगण, बगिचा, रस्ते, सभागृह बांधकाम किंवा सार्वजनिक वापरासाठी राखीव भूखंड असणे गरजेचे आहे. यासाठी अकृषक आदेशातच ले-आऊट मध्ये नागरिक वापरा करिता निर्धारित जागा ठरवून दिली जाती. याच भूखंडावर भूमाफिया व तलाठ्यांनी मिळून राखीव भूखंडाचा बनावट सातबारा तयार करून प्लॉट तयार केले आहे.
त्यांची सर्रास विक्री केली जात असून हे प्लॉट राखीव भूखंड असल्याचे जाणिवपूर्वक लपविले जाते. भूमाफियांच्या या फसवेगिरी ला अल्प व मध्यम उत्पन्न गटातील नागरिक बळी पडल्याचे दिसून येते. राखीव भूखंडाचे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत नाही. परंतु भूमाफियांच्या ले-आऊट्च्या प्लॉटची विक्री देखील होत आहे. भूमाफिया हे तलाठी सोबत साठगाठ करून खोटा सातबारा करून प्लॉटची विक्री करीत असल्याचे दिसून येत आहे. ले-आउट बांधकाम झालेल्या प्लॉट मालकांना ही बाब लक्षात येताच त्यानी याची तक्रार पोलीस व तहसीलदारांकडे केली आहे. तसेच उच्च चौकशीची मागणी शासनाकडे केली आहे.
----------------------------------
तक्रारींची दखल घेणार
आमगाव येथील अनेक ले-आऊट मधील नागरिक सुविधेसाठी राखीव जागेत काही भूमाफियांनी बनावट सातबारा तयार करून प्लाॅट तयार करून विक्री केली आहे अशा तक्रारी आहेत. या तक्रारींवर कार्यवाही करून बनावट सातबारा रद्द करण्यात येईल.
- डी.एस.भोयर
तहसीलदार, आमगाव