गोरेगाव : गोरेगाव ते गोंदिया राष्ट्रीय महामार्गाचे सिमेंट रस्ता बांधकाम जगताप कन्स्ट्रक्शन कंपनीला दिले असून, गोरेगाव शहरातील मुख्य महामार्गाचे खोदकाम सुरू आहे. यातील गौण खनिजाचा वापर सार्वजनिक ठिकाणी किंवा खड्डे भरण्यासाठी न करता कंपनीचे कर्मचारी खासगी बांधकाम करीत असलेल्यांना विक्री करीत असल्याचा आरोप नागरिकांनी केला असून चौकशी करण्याची मागणी केली आहे.
गोंदिया-कोहमारा महामार्गावरील गोंदिया ते एमआर पेट्रोलपंप गोरेगावचे रस्ता बांधकाम दोन वर्षांपासून सुरू आहे. गोरेगाव शहरातील रस्ता बांधकामाबाबत जगताप कंट्रक्शन कंपनी व नगरपंचायत यांच्यात वाद निर्माण झाला होता. त्यामुळे हे बांधकाम काही काळ कंपनीने थांबवून नागरिकांच्या सोयीनुसार नुकतेच सुरू केले. जुन्या डांबरीकरण रस्त्याचे खोदकाम करून यातील मातीमिश्रीत मुरुम मोठ्या प्रमाणात टिप्परमध्ये टाकून मागणीनुसार खासगी बांधकाम करणाऱ्यांना विकले जात आहे. ही बाब काही नागरिकांनी महसूल विभागात कार्यरत कर्मचाऱ्यांच्या लक्षात आणून दिली. पण कारवाई करण्यात आली नाही.
कोट
नवीन सिमेंट रस्ता बांधकाम करताना जुन्या रस्त्याचे खोदकाम सुरू आहे. यातील गौण खनिज कंपनीला विकण्याचा अधिकार नाही, पण ते सार्वजनिक बांधकाम ठिकाणी, खड्डे बुजविण्यासाठी उपयोगात आणता येते.
सचिन गोसावी, तहसीलदार गोरेगाव